रक्तदाबाच्या रुग्णाने खरेदी केलेल्या गोळ्यांच्या सीलबंद पाकिटात डास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:25 AM2017-08-04T02:25:52+5:302017-08-04T02:26:35+5:30
रक्तदाबाच्या रुग्णाने खरेदी केलेल्या गोळ्यांच्या सीलबंद पाकिटात डास आढळल्याची घटना खारघरमधील कोपरा गावात गुरुवारी घडली. रोहिदास गायकर यांच्याबरोबर हा प्रकार घडला आहे.
पनवेल : रक्तदाबाच्या रुग्णाने खरेदी केलेल्या गोळ्यांच्या सीलबंद पाकिटात डास आढळल्याची घटना खारघरमधील कोपरा गावात गुरुवारी घडली. रोहिदास गायकर यांच्याबरोबर हा प्रकार घडला आहे. आजार बरा करण्यासाठी घेतल्या जाणा-या औषधामध्येच असा प्रकार घडत असेल तर विश्वास कोणावर ठेवावा, अशी चर्चा परिसरात आहे.
कोपरा गावातील सेक्टर १० येथील लिबर्टी केमिस्ट या मेडिकल दुकानातून रोहिदास गायकर यांनी रक्तदाब नियंत्रणाच्या गोळ्या खरेदी केल्या होत्या. रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे नेहमीप्रमाणे ते गोळ्या घेवून घरी आले. ग्लाईसीफेज नावाच्या सीलबंद गोळ्यांच्या पाकिटातील एका गोळीत डास आढळून आला. सीलबंद पाकिटात डास आढळल्याने गायकर यांनी औषधोपचाराच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रक्तदाब हा गंभीर स्वरूपाचा आजार असून त्यावर नियमित गोळ्या घ्याव्या लागतात. मात्र औषध कंपन्यांकडून असा निष्काळजीपणा होत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
या प्रकाराबद्दल मेडिकल चालकाला माहिती दिली असता त्यांनी संबंधित औषध परत घेऊन त्या बदल्यात दुसरे औषध देतो, असे सांगितले.