कर्करोगावर आता प्रोटॉन थेरपीची ‘मात्रा’, खारघरमधील टाटा रुग्णालयात सुविधा; उपचाराच्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 12:14 PM2021-08-02T12:14:23+5:302021-08-02T12:14:51+5:30

कर्करोगाच्या पेशींवर तत्काळ घाव घालण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्रोटॉन थेरपीला खारघरमधील टाटा रुग्णालय येथे लवकरच सुरुवात होणार आहे. याकरिता क्लिनिकल ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे.

‘Dose’ of proton therapy now on cancer, facility at Tata Hospital in Kharghar; Approval of clinical trials of treatment | कर्करोगावर आता प्रोटॉन थेरपीची ‘मात्रा’, खारघरमधील टाटा रुग्णालयात सुविधा; उपचाराच्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी

कर्करोगावर आता प्रोटॉन थेरपीची ‘मात्रा’, खारघरमधील टाटा रुग्णालयात सुविधा; उपचाराच्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी

googlenewsNext

पनवेल : कर्करोगाच्या पेशींवर तत्काळ घाव घालण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्रोटॉन थेरपीला खारघरमधील टाटा रुग्णालय येथे लवकरच सुरुवात होणार आहे. याकरिता क्लिनिकल ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे. एका वर्षात ८०० रुग्णांना या ठिकाणी थेरपी देण्याचा मानस रुग्णालय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
कॅन्सरवर वैद्यकीय उपचार करताना शरीरातील कर्ककारक नसलेल्या इतर पेशींना न मारता कॅन्सरसाठी कारणीभूत असलेल्या पेशींवर घाव घालण्यासाठी प्रोटॉन थेरपी उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी टाटा कॅन्सर रुग्णालयाने सुरू केलेल्या खारघर येथील केंद्रामध्ये हेड्रॉन बीम थेरपी (प्रोटॉन) यंत्र आणण्यात आले आहे. हे यंत्र केवळ शरीरामध्ये असलेल्या कॅन्सरच्या पेशींचा नाश करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. बेल्जियममधील आयबीए कंपनीच्या माध्यमातून या मशीनची निर्मिती करण्यात आली. टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये येणाऱ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना रेडिएशन थेरपी देण्यात येते. या प्रक्रियेत काहीवेळा चांगल्या पेशीही मारल्या जातात. त्यामुळे प्रोटॉन थेरपीमध्ये केवळ कॅन्सरच्या पेशींना शोधून त्यांना नष्ट करण्यात येणार आहे. क्लिनिकल ट्रायलला मंजुरी मिळाल्यानिमित्त शनिवारी छोटेखानी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला टीएमसीचे डॉ. सिद्धार्थ लस्कर, टाटा एक्ट्रेक्टचे संचालक सुदीप गुप्ता व आयबीएचे राकेश पाठक उपस्थित होते.   

फायदा सर्वाधिक कॅन्सरग्रस्त मुलांना 
अमेरिकेसारख्या देशामध्ये या उपचाराचे एक चक्र घेण्यास १० ते १२ लाखांचा खर्च करण्यात येतो. या मशीनची किंमत सुमारे ५५० कोटी रुपये आहे. या थेरपीच्या माध्यमातून सर्वाधिक सक्षम व प्रगत तंत्रज्ञान असल्याचा विश्वास रुग्णालयाचे ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सिद्धार्थ लश्कर यांनी व्यक्त केला. या थेरपीचा फायदा कॅन्सरग्रस्त मुलांना सर्वाधिक मिळेल, असा विश्वास आयबीएचे राकेश पाठक यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनच्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या परवानगी घेऊन संबंधित यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाठक म्हणाले. 

तीन वर्षांपासून पूर्वतयारी 
जगातल्या केवळ १२० देशांमध्ये ही थेरपी उपलब्ध आहे. आता त्यात टाटा कॅन्सर रुग्णालयाचाही समावेश आहे. खारघर येथील केंद्रामध्ये ही थेरपी सुरू करण्यासंदर्भात मागील तीन वर्षांपासून पूर्वतयारी सुरू होती. देशात सरकारी संस्थेमार्फत अशाप्रकारची अद्ययावत उपचार पद्धती सुरू होणारी खारघरमधील टाटा एक्ट्रेक्ट ही पहिलीच संस्था असल्याचे टाटा एक्ट्रेक्टचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले.

Web Title: ‘Dose’ of proton therapy now on cancer, facility at Tata Hospital in Kharghar; Approval of clinical trials of treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.