नवी मुंबई : तुर्भेमधील संजय भोसले यांचे अजारपणामुळे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी कुटुंबिय जळगाव येथील मुळ गावी गेले असताना चोरट्यांनी घरामध्ये चोरी केली आहे. दागिने व रोख रक्कम असा २ लाख ५२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला असून यामुळे भोसले कुटुंबियांना दुहेरी धक्का सहन करावा लागला आहे.
तुर्भे सेक्टर २२ मध्ये संजय भोसले यांचे कुटुंबिय वास्तव्य करत होते. भोसले यांना अर्धांगवायू झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी महानगरपालिका रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना १८ डिसेंबरला त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची पत्नी व मुलगी दिवसकार्याच्या विधीसाठी गावी थांबल्या होत्या. २५ डिसेंबरला पहाटे तुर्भेमधील त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच जवळच राहणाऱ्या नातेवाईकांना फोन करून माहिती दिली. नातेवाईकांनी घरी येवून पाहणी केली असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले असल्याचे दिसले. आतमधील सोन्या, चांदीचे दागिने व रोख १ लाख ६० हजार असा एकूण २ लाख ५२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.
अगोदर कुटुंब प्रमुखाचा मृत्यू व नंतर घरात झालेली चोरी यामुळे भोसले कुटुंबियांना धक्का बसला आहे. या घटनेविषयी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी लवकरात लवकर चोरांचा शोध घेवून संबंधीतांना त्यांचा ऐवज मिळवून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.