नवी मुंबई महापालिकेला डबल ए प्लस पत मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 06:56 AM2018-04-06T06:56:53+5:302018-04-06T06:56:53+5:30
महापालिकेस इंडिया रेटिंग अॅण्ड रिसर्च या देशातील मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने डबल ए प्लस स्टेबल हे पत मानांकन दिले आहे. सातत्याने चौथ्या वर्षी अशाप्रकारे मानांकन मिळविणारी नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे.
नवी मुंबई : महापालिकेस इंडिया रेटिंग अॅण्ड रिसर्च या देशातील मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने डबल ए प्लस स्टेबल हे पत मानांकन दिले आहे. सातत्याने चौथ्या वर्षी अशाप्रकारे मानांकन मिळविणारी नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे.
महापालिकेच्या २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी २९८७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला होता. त्यापैकी २९५० कोटी रुपये जमा करण्यात यश आले आहे. यामध्ये १९६२ कोटी रुपये विविध करांच्या माध्यमातून जमा झाले आहेत. एलबीटी, मालमत्ताकर, नगररचना, पाणीपुरवठा विभागांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात करवसुलीची अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत उत्तम कामगिरी केल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती सक्षम झाली आहे. मालमत्ताकराच्या माध्यमातून ५३७ कोटी रुपये जमा केले आहेत. नगररचना शुल्कापोटी १०० कोटी व पाणीपट्टीचे ७५ कोटी रुपये संकलित केले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त रामास्वामी एन. यांनी पालिकेच्या कामकाजामध्ये आर्थिक शिस्त लावली आहे. दीड वर्षापासून होस्ट टू होस्ट या अभिनव प्रणालीद्वारे ठेकेदारांची बिले दिली जात आहेत. कामकाजामध्ये पारदर्शकता
आणली असून, पेपरलेस कामकाज केले जात आहे. राज्य शासन, एमएमआरडीए, एमआयडीसी यापैकी कोणाचेही कर्ज पालिकेने
थकविलेले नाही. यामुळे महापालिकेला फिच या
नामांकित संस्थेमार्फत डबल ए स्टेबल पत मानांकन मिळाले आहे. सलग चौथ्या वर्षी हे मानांकन मिळाले आहे.