नवी मुंबई : तुर्भे येथील पुलाच्या उतारावर वाहन वाहनचालकांना थेट मृत्यूच्या दाढेत सोडण्यात आले आहे. पुलाच्या उताराला सरळ रेषेतच हरित पट्टा असल्याने भरधाव वाहने थेट त्यामध्ये घुसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु पुलाची बांधणी करताना रस्त्यावरील परिस्थीचा बारकाईने अभ्यास न झाल्याने वाहचालकांना त्याठिकाणी अचानक वळण घेऊन स्वतःला सुरक्षित करावे लागत आहे. यामध्ये वाहनांच्या अपघाताची देखील शक्यता निर्माण होत आहे.
तुर्भे येथील रेल्वे पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाने नवा पूल उभारला आहे. अनेक महिने उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेला हा पूल अखेर रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. सायन पनवेल मार्गावरील या जुन्या तुर्भे पुलावरील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून दोन्ही दिशेला नवा पूल उभारण्यात आला आहे. मात्र पुलाचा प्रत्यक्षात वापर होऊ लागल्यानंतर त्यावरील त्रुटी देखील समोर येऊ लागल्या आहेत. त्यावरून पुलाचे बांधकाम करताना तांत्रिक बाबींचा विचार झाला आहे कि नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. परिणामी भविष्यात पुलावर व पुलाच्या उतारावर अपघातांच्या मालिका घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जुईनगरकडून सानपाडाकडे येणाऱ्या लेनवर पुलाच्या उतारालाच भरधाव वाहनांना अचानक वळण घ्यावे लागत आहे. यामध्ये अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. पुलावरून दुसऱ्या व दुसऱ्या लेनमधील वाहनांना पूल उतरताच समोर हरित पट्ट्यात वाहन घुसण्यापासून वाचवण्याची कसरत करावी लागत आहे. पुलाचा उतार रस्त्याला जोडला जाणे आवश्यक असताना तो सरळ रेषेत पुलाचा शेवट करण्यात आला आहे. यामुळे अगोदरच रस्त्यालगत असलेला हरित पट्टा थेट पुलाच्या मध्यभागी येत आहे. यामुळे डावीकडून जाणाऱ्या वाहनांना अचानक पहिल्या लेनमध्ये वाहने वळवावी लागत आहेत. यामध्ये वाहनांच्या अपघाताचा धोका निर्माण होत आहे. तर सानपाडा कडून तुर्भेकडे जाणाऱ्या लेनवर पुलावर करण्यात आलेल्या दोन वळणावर असमांतर रस्त्यामुळे चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटत आहे. यामुळे त्याठिकाणी देखील अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.
पुलाच्या उतारावर असलेला कठडा हटवण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवलं आहे. शिवाय पुलावर काही ठिकाणी रम्बलर गरजेचे असून त्याबाबतही कळवण्यात आले आहे. तर सानपाडाकडून तुर्भेकडे येताना ठाणेकडे जाणारा व पनवेलकडे जाणारा असे दोन पूल असल्याने चालकांचा संभ्रम टाळण्यासाठी फलक लावण्याबाबतही कळवले आहे. - श्रीकांत धरणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक- तुर्भे वाहतूक शाखा