बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट कायम, अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हुकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 01:19 AM2020-04-27T01:19:32+5:302020-04-27T01:19:35+5:30
पुढील काही महिने घरविक्रीच्या परिस्थितीत फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याने विकासक आणि गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
नवी मुंबई : कोरोनाचा सर्वाधिक फटका रियल इस्टेट क्षेत्राला बसला आहे. लॉकडाउनमुळे या क्षेत्रातील खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प पडले आहेत. गुढीपाडव्यापाठोपाठ आता अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तही हुकल्याने बांधकाम व्यावसायिकांची पाटी कोरीच राहिली आहे. पुढील काही महिने घरविक्रीच्या परिस्थितीत फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याने विकासक आणि गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
मागील काही वर्षांपासून बांधकाम उद्योगावर मंदीचे सावट आहे. अशा परिस्थितीतही विविध क्लृप्त्या वापरून विकासक मार्केटमध्ये तग धरून आहेत; परंतु आता कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने रियल इस्टेटचे कंबरडेच मोडले आहे. लॉकडाउनमुळे सुरू असलेले अनेक बांधकाम प्रकल्प बंद आहेत.
उद्योजक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना व सवलती जाहीर करतात; परंतु खरेदीसाठी शुभ मानले जाणारे गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीयाचे दोन्ही मुहूर्त हुकल्याने संपूर्ण रियल इस्टेट क्षेत्रात काळजीचे वातावरण आहे.
सिडको कार्यक्षेत्रात मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात नवीन गृहप्रकल्पांची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, सध्या कोरोनाचे संकट ओढावल्याने त्याचा फटका घर नोंदणीला बसला आहे.