नवी मुंबई : फ्लेमिंगोंना गुलाबी रंग देणाऱ्या शेवाळाचे नेरूळच्या डीपीएस तलावात आगमन झाले आहे. वाढती उष्णता, आर्द्रता आणि खारटपणासह पाण्याचे बाष्पीभवन वाढल्यामुळे ओलसर जमिनीच्या काही भागाला गुलाबी रंग प्राप्त होतो. हे शेवाळ आणि बॅक्टेरिया जे कॅरोटीनॉइड्स बनवतात, त्याचा लाल-केशरी रंगद्रव्य, फ्लेमिंगोंचे आवडते खाद्य असून, यामुळे या पक्षाची पिसे गुलाबी होत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
संशोधक आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा गुलाबी रंग लाल अल्गल ब्लूमचा परिणाम आहे. मुंबई महानगर प्रदेशातील यापूर्वीही २०१९ आणि २०२० मध्ये असा प्रकार पाहायला मिळाला होता, असे नॅक कनेक्टचे बी. एन. कुमार यांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिकेने आपल्या प्रस्तावित प्रारूप विकास आराखड्यात डीपीएस तलावासह टीएस चाणक्य पाणथळींच्या परिसरात निवासी आणि वाणिज्यिक बांधकामे प्रस्तावित केली आहेत. त्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक चमत्कार असलेली ही घडल्याने महापालिकेच्या नगररचना खात्यातील अधिकाऱ्यांचे बिल्डरधार्जिणे पितळ उघडे पडले आहे. एखाद्या तलावाचा गुलाबी रंग होणे हे लाल अल्गल ब्लूमचा परिणाम मानला जातो. यामुळे या डीपीएस टीएस चाणक्य या पाणथळींचे अस्तित्व नाकारू पाहणारे महापालिका, वनखात्याचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांनाही घटना म्हणणे सणसणीत चपराक असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.