लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने ऐरोलीमध्ये उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास रविवारी दिवसभरामध्ये १० हजार नागरिकांनी भेट दिली. येथील चित्रात्मक जीवनचरित्र, ग्रंथभांडार, दुर्मीळ भाषणे व होलोग्राफिक शो पाहण्यासाठी वर्षभर नागरिक येत असतात. सव्वा दोन वर्षांमध्ये तब्बल २ लाख ५७ हजार नागरिकांनी भेट दिली आहे.
महानगरपालिकेने ५ डिसेंबर २०२१ ला स्मारकामधील सुविधांचे लोकार्पण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगातील दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली आहेत. जन्मापासून ते महानिर्वाण दिनापर्यंतचा प्रवास या चित्रदालनामधून उलगडतो. यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यांतून नागरिक स्मारकाला भेट देण्यासाठी येत आहेत. रविवारी जयंतीनिमीत्त पहाटेपासून नागरिकांनी स्मारकामध्ये हजेरी लावली होती. दिवसभरात १० हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी स्मारकाला भेट दिली. मागील सव्वा दोन वर्षामध्ये २ लाख ५७ हजार ३४० नागरिकांनी भेट दिल्याची नोंद झाली आहे. जयंतीनिमीत्त नागरिकांच्या सुविधेसाठी महानगरपालिकेने विशेष उपाययोजना केली होती.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शिरीष आरदवाड, संजय देसाई, शरद पवार, किसनराव पलांडे, सोमनाथ पोटरे, मदन वाघचौरे, अजय संख्ये, प्रवीण गाडे, अशोक अहिरे, सर्जेराव परांडे, अभिलाषा म्हात्रे यांच्यासह महानगरपालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.....................स्मारकाचे वैशिष्ट्येनवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडून दाखविणारी छायाचित्र व माहितीचे दालन आहे. ५२८२ ग्रंथांचे प्रशस्त ग्रंथालय आहे. ऑडियो व्हिज्युअर ई लायब्ररी आहे. आभासी चलचित्र प्रणालीद्वारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची संधी देणारा अत्याधुनिक होलोग्राफिक प्रेझेंटेशन शो दाखविण्यात येतो. एकाचवेळी २०० नागरिक ध्यान करू शकतील असे ध्यानकेंद्रही आहे. स्मारकामध्ये विशेष संविधान कक्ष असून येथे वर्षभर विचारवेध व जागर व्याख्यानमाला सुरू असते.