धाटाव :एका महिलेसह अन्य समाजातील लोकांना जातीवाचक शब्द वापरून अपमान केल्याचे माणगाव येथील डॉ. संतोष भास्कर कामेरकर याला महागात पडले आहे. गुरुवारी माणगावच्या सह जिल्हा व सत्र न्यायाधीश चित्रा हंकारे यांनी त्याला दोषी ठरवून दोन वर्षे सहा महिने आणि ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षाच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली.माणगाव ग्रामपंचायतीमध्ये २६ जानेवारी २०१३ रोजी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण समारंभ आटोपल्यानंतर ग्रामसभा सुरु झाली. त्यावेळी आरोपी डॉ. संतोष कामेरकर याने मौजे नोणारे आदिवासी वाडी येथील सर्व्हे नंबर १३५/१ प्रोटेक्ट फॉरेस्ट ही जागा शाळा बांधणीसाठी मिळावी, असा विषय मांडला, परंतु सदरची जागा ही फिर्यादी तारा रामा जाधव आणि फिर्यादीच्या समाजाच्या लोकांच्या वहिवाटीची असल्याने त्याला विरोध केला. त्याचा राग धरुन डॉ. संतोष कामेरकर याने त्यांना जातीवाचक शब्द वापरले, तसेच ते भूमाफिया आणि चोर आहेत, असे डॉ. संतोष कामेरकर बोलला. फिर्यादीसह अन्य हे कातकरी समाजाचे आहेत हे माहीत असतानाही डॉ. कामेरकने याने जातीवाचक शब्द वापरुन त्यांना अपमानित केले होते.या घटनेची फिर्याद माणगाव पोलिसांनी घेतली होती. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार डॉ. कामेरकरवर गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल झेंडे व सहायक पोलीस निरीक्षक बी.एन.होतमोडे यांनी करुन डॉ. कामेरकर विरोधात माणगावच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. फिर्यादीच्या वतीने अॅड. निलेश रातवडकर यांनी काम पाहिले.
डॉ. कामेरकरला दोन वर्षे सहा महिन्यांची शिक्षा
By admin | Published: May 13, 2016 2:18 AM