मीरा रोड : सुट्या पैशांअभावी भाईंदरमधील कार्तिक ऊर्फ लाला रमेश शाह (३६) यांचा मंगळवारी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या डॉ. संगीता परमार यांच्यावर भाईंदर पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून प्राथमिक चौकशी झाली.कार्तिक यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी ७०० रुपये सुटे नसल्याने उपचारास विलंब केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा ठपका नातलगांनी ठेवला आहे. परमार यांचा अद्याप जबाबही घेतलेला नाही. त्या उद्या बाजू मांडणार आहेत. मंगळवारी कार्तिक हे घरी जात असताना इमारतीच्या तळ मजल्यावर चक्कर येऊन पडले. रहिवाशांनी डॉ. परमार यांच्याकडे धाव घेतली. पण, तातडीने उपचार करण्यासाठी न जाता परमार यांनी ७०० रुपये फी मागितली. तेही ५००-१००० रुपयांच्या नोटा नव्हे, तर सुट्टे देण्यास सांगितले. अखेर, रहिवाशांनी सुटे पैसे आणून दिल्यावर डॉ. परमार उपचारासाठी गेल्या. तोपर्यंत कार्तिक यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
डॉ. परमार यांच्यावर अद्याप कारवाई नाही
By admin | Published: November 18, 2016 3:18 AM