नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे काम निवडणूक विभागाने सुरू केले आहे. १६ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या याद्यांवर २३ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती मागविल्या जाणार आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण करून १२ मार्चला मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची उत्सुकता सर्वच शहरवासीयांना लागली आहे. २०२० मध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु मार्चपासून कोरोना प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली व त्यामुळे निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. जवळपास एक वर्षानंतर पुन्हा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीसाठी मतदार याद्या महत्त्वाच्या असल्यामुळे त्या कधी प्रसिद्ध होणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक विभागाने १६ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व १५ जानेवारी २०२१ पर्यंतच्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय याद्यांचे विभाजन करून त्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या याद्यांमध्ये काही त्रुटी असतील किंवा त्याविषयी नागरिकांचे काही आक्षेप असतील तर ते दूर करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ देण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये नागरिकांनी त्यांच्या हरकती सादर करणे अपेक्षित आहे. या हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर ३ मार्च रोजी प्रभागनिहाय अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. ८ मार्चला मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध केल्यानंतर १२ मार्चला मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.प्रभागाच्या यादीत करण्यात येणार दुरुस्त्या प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहायमतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे,नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूकआयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करतानालेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनहीप्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येणार आहेत. याद्यांविषयी उत्सुकता सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांना मतदार याद्यांविषयी उत्सुकता लागली आहे. मतदार याद्यांमध्ये जास्त त्रुटी नसतील तर अर्धी लढाई जिंकल्यासारखे वाटत असते. याद्यांमध्ये त्रुटी असल्या तर त्या दुरुस्त करून घेणे, सूचना व हरकती दाखल करणे व त्रुटी सुधारून घ्याव्या लागत असतात. यामुळे आता सर्वांनाच याद्या अनुरूप येणार की नाही याविषयी उत्सुकता लागली आहे.
प्रारूप मतदार याद्या १६ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार, २३ फेब्रुवारीपर्यंत सूचना हरकतीची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 2:38 AM