नाल्यात गाळ, प्लास्टिकचा खच
By admin | Published: February 17, 2017 02:18 AM2017-02-17T02:18:09+5:302017-02-17T02:18:09+5:30
कोट्यवधी रुपये खर्च करून शहरातील नाल्यांची सफाई केली जाते. मात्र, तरीदेखील हे नाले गाळाने भरलेले दिसून येतात.
नवी मुंबई : कोट्यवधी रुपये खर्च करून शहरातील नाल्यांची सफाई केली जाते. मात्र, तरीदेखील हे नाले गाळाने भरलेले दिसून येतात. सीबीडी परिसरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, प्लास्टिकचा कचरा पाहायला मिळतो. प्रशासनाने या नाल्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने अस्वच्छतेचे प्रमाण वाढल्याची तक्रार परिसरातील नगरसेवकांनी केली आहे.
पावसाळ्यापूर्वी पालिका दरवर्षी नालेसफाईची मोहीम हाती घेते. गेल्या वर्षी नाले सफाई करूनही अवघ्या सहा महिन्यांतच नाल्यांतून कचरा वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक नाले आणि गटारे कचरा आणि प्लास्टिक पिशव्यांमुळे तुंबली असून, आजूबाजूच्या रस्त्यांवरही घाणीचे ढीग साचले आहेत.
सीबीडी सेक्टर ८ मधील नाल्यात प्लास्टिक पिशव्या, बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात खच पाहायला मिळत आहे. नाल्यात काही ठिकाणी कचरा तुंबल्याने ठिकठिकाणी पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. परिणामी, डासांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ््यात या ठिकाणी साचणाऱ्या पाण्यातून विषारी साप घरात येण्याची भीती रहिवाशांना भेडसावते.
आर्टिस्ट कॉलनी परिसरातील नाल्याच्या देखभाल दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. नाल्यात घाण कुजत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)