घणसोलीत अनधिकृत इमारतीसाठी नाल्यावर भराव; अधिकारी मोकाट, भूमाफिया झाले सैराट
By नारायण जाधव | Published: November 18, 2023 07:12 PM2023-11-18T19:12:17+5:302023-11-18T19:12:28+5:30
नवी मुंबई महापालिका परिसरात सध्या लोकप्रतिनिधींची राजवट नसल्याने प्रशासनाला हाताशी धरून भूमाफिया मोकाट झाले आहेत.
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिसरात सध्या लोकप्रतिनिधींची राजवट नसल्याने प्रशासनाला हाताशी धरून भूमाफिया मोकाट झाले आहेत. दिवसेंदिवस घणसोली, तळवली, गोठिवली परिसरात दहा पंधरा दिवसांतच इमारती उभ्या राहत असून त्यांना वीज, पाणी जोडण्याही मिळत आहेत. अशाच प्रकारे घणसोलीतील सेक्टर २१ मध्ये एका भूमाफियाने अनधिकृत इमारत बांधण्यासाठी चक्क नैसर्गिक नाला बुजविण्याचे काम सुरू केले आहे. नैसर्गिक नालाच बुजविल्यास या परिसरात नाल्याचा वाहून जाणारे सांडपाणी तुंबून ते नजीकच्या निवासीवस्तीत शिरून मोठी हानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
जर नैसर्गिक नाला, ओहोळ, पाण्याचा प्रवाह अडविणे हा गंभीर गुन्हा आहे. मात्र, दिवसाढवळ्या घणसोली-तळवली परिसरात असे प्रकार घडत असून नवी मुंबई महापालिकेसह सिडकोने याकडे सपलेश दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे. या परिसरातील अनधिकृत बांधकामांना नवी मुंबई महापालिका आणि सिडको अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याने असे प्रकार वाढत असल्याचा स्थानिकाचा आरोप आहे.
माजी लोकप्रतिनिधीच करतायेत मांडवली
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक अनधिकृत बांधकामे घणसोली, तळवली आणि गोठीवली या तीन गावांच्या हद्दीत असून याकडे नवी मुंबई महापालिकेसह सिडकोने दुर्लक्ष केले आहे. तिन्ही गावांतील काही माजी लोकप्रतिनिधींच ही अनधिकृत बांधकामे कोणी तोडू नये, यासाठी नवी मुंबई महापालिकेसह सिडकोच्या अधिकाऱ्यांसोबत मांडवली करीत असल्याची चर्चा आहे.
तात्पुरती होते कारवाई
महापालिकेतील ठाकरे साहेब तर सिडकोतील संजयच्या दूरदृष्टीखाली अनधिकृत बांधकामांचा वे(णू)लू गगनावर गेला आहे. यामुळेच कोणी तक्रार केल्यास महापालिका आणि सिडकोचे अधिकारी तात्पुरते जेसीबीचे भिंतीना फटके मारून दिखाव्यापुरती कारवाई करीत असल्याने भूमाफियांचे चांगलेच फावले आहे.
एमआरटीपी नोटिसांबाबत संशयाचे धुके
सिडकोने पनवेलच्या नैना आणि खोपटा परिसरात एका बांधकामांवर केलेली कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. येथील एका उद्योजकाने त्याच्यावर केलेली कारवाई, सिडकोने पाठविलेल्या नोटिसांबाबत माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागविली हाेती. त्यात सिडकोने नोटिसा पाठविल्या नसल्याचे उत्तर दिले आहे. यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ज्या अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा पाठविल्या, त्या खऱ्या की खोट्या, त्यांच्यावर पुढे काय कार्यवाही केली, की नोटिसींचे कागदी घोडे नाचविले, या प्रश्नांसह संशयाचे धुके अधिक गडद होत चालले आहे.