पनवेल : सिडको हद्दीतील कामोठे येथील सेक्टर ८ येथे गटाराचे घाण पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गटाराचे घाण पाणी रस्त्यावर साचत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न शहरात निर्माण होत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही काही ठोस उपाय होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.कामोठे शहर सिडकोने वसविलेले आहे. मात्र काही ठिकाणी सुविधांचा बोजवारा उडालेला दिसून येत आहे. सेक्टर ८ परिसरात उघड्या गटारांचे पाणी रस्त्यावर येत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. येथे बाजूलाच भगवान शंकरांचे मंदिर, शाळा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक व विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. बाजूलाच सद्गुरू वामनराव पै यांचे सेंटर आहे. या घाणीमुळे येथून चालणे देखील मुश्किल झालेले आहे. गेल्या वर्षी आयुक्तांनी देखील या भागाची पाहणी केली होती मात्र घाण पाणी अद्यापही वाहतच आहे. तक्रार केली असता तात्पुरती साफसफाई करण्यात येते, मात्र दोन दिवसाने परत ये रे माझ्या मागल्या सारखा प्रकार या ठिकाणी दिसून येतो. तरी नागरिकांची गैरसोय होणाऱ्या या ठिकाणी गटाराची दुरुस्ती तसेच नियमित साफसफाई होणे गरजेचं आहे. गटाराचे पाणी मोकळ्या जागेत साचते. प्रशासनाने ठोस पावले उचलून ही समस्या कायमस्वरुपी सोडवावी अशी मागणी नागरिकांसह कामोठे रहिवासी सामाजिक संस्थेने केली आहे. काही ठिकाणी गटाराच्या पाण्याचा जोर एवढा असतो की रस्त्यावर चालवणे ही शक्य होत नाही. या गटाराचे घाण पाणी अर्धा किलोमीटर रस्त्यावर आले आहे. वाहन बाजूने गेले असता पादचाऱ्यांच्या अंगावर हे पाणी असल्याने हमरीतुमरीचे प्रकार घडले आहेत.
कामोठे येथे गटाराचे घाण पाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:50 PM