नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ४ येथील पावसाळी उघड्या नाल्यातून सांडपाणी प्रकिया न करताच खाडीत सोडण्यात आले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
शहरातील सांडपाण्यावर प्रकिया करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रत्येक नोडमध्ये मलनिःसारण केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. खाडीतील पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी खाडीत सोडण्यात येते. यामधील काही पाणी उद्याने तसेच कारंजांसाठी वापरले जाते. नेरूळ सेक्टर ४ मधील ग्रेट ईस्टर्न गॅलरी या इमारतीच्या समोरून खाडीच्या दिशेने पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी सिडकोकालीन नाल्याची महापालिकेच्या माध्यमातून पुनर्बांधणी करण्यात आली असून काही अंतरापर्यंत हा नाला बंदिस्त करण्यात आला आहे.
या पावसाळी नाल्यातून पावसाळ्यात पावसाचे पाणी वाहने अपेक्षित असताना वर्षभर मलवाहिन्यांचे सांडपाणी वाहत असते. यामुळे नाला परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला असून सांडपाण्यावर कोणतीही प्रकिया न करता थेट खाडीत सोडण्यात आलेल्या या सांडपाण्यामुळे खाडीतील पाणीदेखील प्रदूषित होत असून महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.