सिडकोचे स्वप्न साकार करणाऱ्यांची ओंजळ रिकामी
By admin | Published: January 13, 2017 06:18 AM2017-01-13T06:18:42+5:302017-01-13T06:18:42+5:30
दगडावर घणाघाती प्रहार करून सिडकोला शहर निर्मितीसाठी मदत करणाऱ्या दगडखाण
अलिबाग : दगडावर घणाघाती प्रहार करून सिडकोला शहर निर्मितीसाठी मदत करणाऱ्या दगडखाण कामगारांची ओंजळ पिण्याच्या पाण्यावाचून रिकामीच आहे. गेल्या २५ वर्षांपासून पनवेल तालुक्यातील उलेवे-सिद्धार्थनगरमध्ये अशीच परिस्थिती असल्याने त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पाण्यासाठीची भटकंती थांबावी आणि कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन सिद्धार्थनगर गणेशपुरी रहिवासी संघटनेने गुरुवारी जिल्हा प्रशासनाला दिले.
नवी मुंबईचा विकास ज्या पायावर उभा आहे. त्या पायाचा दगड हा पनवेल तालुक्यातील उलवे येथील सिद्धार्थनगर परिसरातील दगडखाण कामगारांनी फोडला आहे. त्यांच्या मेहनतीच्या बळावरच सिडकोने नवी मुंबईची निर्मितीचे स्वप्न सत्यात उतरविले. दगडखाणीत काम करणारे काही कामगार अशिक्षित आहेत. येथील सर्व्हेे नंबर ५१ मध्ये त्यांची गेल्या २५ वर्षांपासून घरे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. सिद्धार्थनगरमध्ये ५०० नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अद्यापही सोय नाही. तेथील रहिवाशांकडे रेशन कार्ड, आधार कार्ड आहे, तसेच घटनेने दिलेला मतदानाचा हक्कही येथील नागरिक बजावतात, असे सिद्धार्थनगर गणेशपुरी रहिवासी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, यांच्यासह स्थानिक प्रशासनाला निवेदन दिले आहे.
प्रशासनाने पाण्याची व्यवस्था करावी
२१ व्या शतकातही दलितांच्या, कष्टकऱ्यांच्या वस्तीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी फिरावे लागते. हा एक प्रकारे त्यांच्यावर अन्यायच आहे. पाणी नाकारणे हा विषय अॅट्रॉसिटी अंतर्गत येतो, तसेच हे कृत्य घटनाबाह्य आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
अशी मागणी संघटनेचे सल्लागार राजाराम पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. येथील नागरिक हे कित्येक वर्षे संघटित नव्हते. त्यामुळे त्यांना आपल्या हक्काची जाणीव नव्हती. आता ते संघटित झाले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असेही पाटील यांंनी स्पष्ट केले.
500 नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अद्यापही सोय नाही. सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेशपुरी येथून पायपीट करून त्यांना पाणी आणावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांची ही पायपीट रोजचीच झाली आहे.
150 नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अद्यापही सोय नाही. पाण्याची व्यवस्था करावी यासाठी आ. प्रशांत ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह स्थानिक ांनी निवेदन दिले आहे.