नवी मुंबई : शहरातील प्रकल्पग्रस्तांनी १९७० सालापासून बांधलेल्या घरांना नियमित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने त्यांच्या वतीने सोमवारी वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या प्रसंगी बोलताना शहरातील गावठाण परिसराचा विकास करून ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याचे ध्येय असल्याची प्रतिक्रिया मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली. खारी कळवा बेलापूर विभाग शेतकरी समाज संघटना आणि एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती यांच्या वतीने आयोजित या सत्कार समारंभाप्रसंगी प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. वाढत्या कुटुंबाची गरज म्हणून शहरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी गरजेपोटी घरे बांधली असून ती नियमित करण्यात यावी, याकरिता प्रकल्पग्रस्तांनी गेली २० वर्षे आंदोलने केली, लढा दिला तरीदेखील हा प्रश्न कायम होता. त्यानंतर २००४ सालापासून आमदार मंदा म्हात्रे यांनी स्वत: याकडे लक्ष देऊन वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा या ऐतिहासिक निर्णयाचे संपूर्ण श्रेय आमदार मंदा म्हात्रे यांना जाते आणि त्यासाठीच त्यांच्या कार्याचा हा गौरव करणाऱ्या सोहळ््याचे आयोजन केल्याची प्रतिक्रिया उपस्थित प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली. सत्कार सोहळ््याला खारी कळवा बेलापूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर पाटील, प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेवक एम. के. मढवी, नगरसेवक किशोर पाटकर, भाजपाचे नेते रामचंद्र घरत, रमाकांत म्हात्रे, प्रकल्पग्रस्त महिला आघाडीच्या जयश्री पाटील, अॅड. पी. सी. पाटील, बाळाराम पाटील, राजेश पाटील, नगरसेवक दीपक पवार, सरोज पाटील, शहरातील प्रकल्पग्रस्त संघटनांचे सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)>प्रकल्पग्रस्तांकडे सिडकोचे दुर्लक्ष नियमानुसार गावठाण भागाची सीमा आखणे, नवी मुंबईतील गाव-गावठाण परिसरांचा विकास करणे, प्रत्येक गावाचे नियोजन करणे आदी जबाबदारी सिडकोने पार पाडलीच नाही. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या नेमक्या काय आहेत, हे जाणून घेण्यात सिडको अयशस्वी ठरली असून, आमदार मंदा म्हात्रे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने लढा देऊन अनेक समस्या सोडविल्याची प्रतिक्रिया राजेश पाटील यांनी व्यक्त केली.>
गावांच्या विकासाचे स्वप्न साकारणार
By admin | Published: May 11, 2016 2:22 AM