पालिकेने वाशीत साकारली स्वप्नातील भिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 02:24 AM2018-01-20T02:24:58+5:302018-01-20T02:25:25+5:30
महापालिकेने वाशीतील होल्डिंग पाँडच्या पडलेल्या भिंतीची दुरुस्ती करून त्यावर आकर्षक चित्रे रेखाटली आहेत. स्मार्ट सिटीमधील नागरिकांची स्वप्ने व आधुनिक विचार चित्रातून दाखविण्यात आले आहेत.
नवी मुंबई : महापालिकेने वाशीतील होल्डिंग पाँडच्या पडलेल्या भिंतीची दुरुस्ती करून त्यावर आकर्षक चित्रे रेखाटली आहेत. स्मार्ट सिटीमधील नागरिकांची स्वप्ने व आधुनिक विचार चित्रातून दाखविण्यात आले आहेत. चित्रे पाहण्यासाठी व स्वत:चाही सेल्फी काढण्यासाठी तरुणाई या परिसरामध्ये गर्दी करू लागली आहे.
स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून महापालिकेने शहर सुशोभीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी कचरा उचलणे, कचºयाचे वर्गीकरण, सार्वजनिक प्रसाधानगृह या गोष्टींना प्राधान्य दिले जात होते; परंतु यावर्षी शहरातील मोकळ्या जागांचे सुशोभीकरण व इमारतींच्या भिंतींचीही रंगरंगोटी केली जात आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथम भिंतीही बोलू लागल्या आहेत. अभियानाचा भाग म्हणून वाशी प्रभाग ६४च्या नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी त्यांच्या निधीतून होल्डिंग पाँडच्या भिंतींची दुरुस्ती व सुशोभीकरण केले आहे. वाशी बसडेपोकडून सीशोरकडे जाणाºया रोडवर सेक्टर ८मध्ये हा होल्डिंग पाँड आहे. कचºयामुळे या परिसरामध्ये नेहमीच दुर्गंधी असायची. ही समस्या सोडविण्यासाठी भिंतींची दुरुस्ती करून त्यावर चित्रे रेखाटण्याचा निर्णय घेण्यात आला. चित्रांमध्ये नवी मुंबईकरांची स्वप्ने दिसावी, यासाठी ग्राफिटी डिझाइनचे प्रशिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्रे रेखाटली असून, ती नवी मुंबईमध्ये चर्चेचा विषय बनली आहेत. रोबोटचा हात, स्वप्न पाहणारे डोळे, ज्येष्ठ नागरिकांच्या माथ्यावर तिसरा डोळा दाखविण्यात आला असून तो आधुनिक विचारांचे प्रतिबिंब भासत आहे.
नवी मुंबईकरांची स्वप्ने चित्रातून भिंतीवर रेखाटण्यात आली असून, ही बोलकी भिंत पाहण्यासाठी शहरवासीयांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेले नागरिक, महाविद्यालयीन मुले सेल्फी काढण्यासाठी या ठिकाणाला पसंती देत आहेत. सोशल मीडियामधूनही भिंतींचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. नवी मुंबईच्या प्रत्येक नोडमध्ये अशाप्रकारे सुशोभीकरण केले जावे, अशी भूमिका व्यक्त केली जात आहे.