वाहन परवान्यासाठी चालक ‘ऑनलाइन’ पास; उमेदवारांची परीक्षा देणारे रॅकेट
By सूर्यकांत वाघमारे | Published: July 31, 2022 05:47 AM2022-07-31T05:47:32+5:302022-07-31T05:47:59+5:30
नियमांबाबत अज्ञानीही बनले वाहन चालक. वाहनचालकांच्या सोयीसाठी आरटीओची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. परंतु, दलालांमार्फत त्याचा उपयोग अपात्र उमेदवारांना पास करून नफा कमवण्यासाठी होत असल्याचे उघड झाले आहे.
- सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पक्का वाहनचालक परवाना काढण्यापूर्वी शिकाऊ चालक परवाना काढण्यासाठी द्यावी लागणारी चाचणी देणारे रॅकेट उघडकीस आले आहे. आरटीओ आवारात एजंटमार्फत चालणाऱ्या या रॅकेटने शेकडो वाहनचालकांची सराव परीक्षा देऊन त्यांना पास केल्याची शक्यता आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला असून, अनेकांना नोटीस बजावली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी शनिवारी दिली.
वाहनचालकांच्या सोयीसाठी आरटीओची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. परंतु, दलालांमार्फत त्याचा उपयोग अपात्र उमेदवारांना पास करून नफा कमवण्यासाठी होत असल्याचे उघड झाले आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पडताळणीत हा प्रकार उघड झाला असून, याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिकाऊ वाहनचालक परवाना प्रक्रिया पारदर्शक राबवली जात नसल्याचा संशय परिवहन विभागाला आला होता. त्यानुसार सर्व आरटीओ कार्यालयांना पडताळणीचे सूचित केले होते. त्याद्वारे नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी सहायक निरीक्षक तुषार कदम यांच्यामार्फत सापळा रचला होता.
त्यामध्ये कदम यांनी दलाल कुलदीप सिंग याच्याकडे जाऊन त्यांच्या सांगलीतल्या मित्राचे आधार कार्ड देऊन त्याचा शिकाऊ वाहन चालक परवाना बनवायचा असल्याचे सांगितले. त्यानुसार सिंग याने १५०० रुपये घेऊन त्या आधारकार्डद्वारे ऑनलाइन नोंदणी करून उमेदवाराने द्यायची असलेली चाचणीदेखील स्वतः देऊन प्रत्यक्षात उपस्थित नसलेल्या उमेदवाराला पास केले. त्यानंतर अशाच प्रकारे परिसरातील इतरही दलाल नव्याने वाहनचालक परवाना काढत असलेल्या व्यक्तीची सराव परीक्षा उत्तीर्ण करून देत असल्याचे उघड झाले. त्यानुसार २२ जुलैला सिंग विरोधात गुन्हा दाखल करून एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक माणिक नलावडे यांच्या पथकाने गुप्तरित्या इतरही दलालांकडे अशाच प्रकारे बोगस ग्राहक पाठवले. त्यात बहुतांश दलाल घरबसल्या उमेदवारांना पास करून देत असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांमार्फत या सर्वांना नोटिसा बजावल्या आहेत.
दलालच करत होते पास
वाहनचालक परवाना काढण्यापूर्वी शिकाऊ परवाना काढलेला लागतो. त्यासाठी ऑनलाइन परीक्षा देऊन पास होण्यासाठी ६० गुण मिळवावे लागतात.
त्यामध्ये वाहतुकीच्या नियमांशी संबंधित प्रश्न असतात. परंतु, अनेकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत अज्ञान असल्याने त्यांना नापास होण्याची भीती असते. त्यामुळे हे दलाल स्वत: लॉगिन करून चाचणी देऊन अर्जदारांना पास करत होते.
अतिहुशारी आली अंगलट
वर्षानुवर्षे काम करणाऱ्या दलालांना चाचणीचे प्रश्न व त्यांची उत्तरे पाठ झालेली आहेत. यामुळे अवघ्या अर्ध्या ते एक मिनिटात ते उमेदवाराची परीक्षा द्यायचे.
इतक्या कमी वेळात चाचणी पूर्ण कशी होतेय? अशी शंका परिवहन विभागाला आल्याने चौकशीचे आदेश दिले होते.