नवी मुंबई : वाहन अपघात टाळण्यासाठी चालकांमध्ये जनजागृतीच्या उद्देशाने वाहतूक पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रामुख्याने उपस्थित सिने अभिनेता बोमन इराणी यांनी उपस्थितांना वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश देत तुमची सुरक्षा तुमच्याच हाती असल्याचे सांगितले.नवी मुंबई वाहतूक पोलीस व फोर्टीस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा पंधरवडाचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते २४ जानेवारीदरम्यान शहरात हा उपक्रम राबवून चालकांना वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध सिने अभिनेते बोमन इराणी यांच्या हस्ते वाशी येथे करण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त प्रभात रंजन, वाहतूक विभाग उपायुक्त अरविंद साळवे, सौरभ मखीजा, प्रेरणा लंगा, रजत मेहता, उपायुक्त शहाजी उमाप, सुरेश मेंगडे, विश्वास पांढरे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोमन इराणी यांनी आपण अर्धे पोलीस असून प्रत्येकाने स्वत:ला अर्धे पोलीस असल्याचे समजून दक्ष राहिल्यास अनुचित प्रकाराला आळा बसेल. तसेच ज्यांना आईवडील व कुटूंबीयांवर प्रेम नसते तेच नियम तोडून जीव धोक्यात घालतात, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. यामुळे तुमची सुरक्षा तुमच्याच हाती असल्याचे वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश त्यांनी दिला. तर बाहेरून शहरात येणारी व्यक्ती तिथली वाहतूक व्यवस्था पाहूनच प्रभावित होत असते. त्यांच्यावर शहराची चांगली छाप उमटवण्यासाठी प्रत्येकाने दक्ष नागरिक म्हणून वाहतुकीचे नियम पाळण्याचा सल्लाही बोमन इराणी यांनी उपस्थितांना दिला. शहरातली रस्त्यांची व्यवस्था, पार्किंगची सोय व नियम पाळण्याची शिस्त यांची योग्य सांगड झाल्यास अपघाताचे प्रमाण घटेल, असा विश्वास पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी व्यक्त केला. तसेच प्रत्येकामध्ये नियम पाळण्याची मानसिकता निर्माण होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमास शालेय विद्यार्थी, चालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोड सेफ्टी मोबाइल व्हॅन व कॅलेंडरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक पोलिसांतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पोलीस आयुक्तालयातील ११४ शाळांच्या ७ हजार ८०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्यापैकी १२ चित्रांची कॅलेंडरसाठी निवड करण्यात आलेली आहे. तसेच वाहतूक पोलिसांकरिता रिफ्लेक्टर जॅकेट व मास्कचे व पोलीसमित्रांसाठी टी-शर्टचे वाटप करण्यात आले. सततच्या कारवाईऐवजी नागरिकांमध्ये वाहतूक नियमांची जागृती होऊन अपघात टाळावेत, या उद्देशाने हा सुरक्षा सप्ताहाचा पंधरवडा साजरा होत आहे. नियम तोडणाऱ्यांवर कारवाईपेक्षा जनजागृती महत्त्वाची आहे. प्रतिवर्षी उपक्रमातून नियमांचे महत्त्व पटवून देत असल्याचेही वाहतूक उपायुक्त अरविंद साळवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे
By admin | Published: January 12, 2016 1:10 AM