वाहन चालकाची परीक्षा फक्त औपचारिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 03:59 AM2019-01-10T03:59:36+5:302019-01-10T03:59:58+5:30
चालकांचे कौशल्य कागदावरच : नवी मुंबई आरटीओपुढे चाचणीसाठी जागेची परवड
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : वाहनांचा चालवण्याचा परवाना देण्यापूर्वी आरटीओकडून चालकाचे कौशल्य योग्यरीत्या तपासले जात नाही. यामुळे बेशिस्त व कामचलाऊ चालकांचे प्रमाण शहरात वाढल्याचे दिसून येत आहे. चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असून, त्याला आळा घालण्यासाठी परवाना देण्यापूर्वी चालकांचे कौशल्य तपासले जाणे गरजेचे बनले आहे.
रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी काही वर्षांपासून शासनाकडून पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता बेशिस्त चालकांवर धडक कारवाईच्या सूचना वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सतत कारवाया करून बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईच्या मोहीम राबवल्या जात आहेत; परंतु बेशिस्त चालकांच्या मुळापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न अद्यापपर्यंत झालेले नाही. बहुतांश चालकांच्या हाती सहज प्रक्रियेतून चालक परवाना आल्याने रस्त्यावर गर्दीत वाहन चालवताना त्यांचा गोंधळ उडताना दिसून येतो. त्यामुळे चालक परवाना देण्यापूर्वी संबंधिताचे वाहन चालवण्याचे कौशल्य बारकाई तपासणे आवश्यक आहे, तरच वाहतुकीच्या नियमांना शिस्त लागून अपघातांच्या घटनांना आळा बसणे शक्य आहे. नेमके याच बाबीकडे शासनासह आरटीओचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे केवळ औपचारिकता म्हणून चाचणी घेऊन चालक परवाना देण्याची कार्यपद्धती सद्यस्थितीला नवी मुंबई आरटीओ राबवत आहे.
नवी मुंबई आरटीओकडून एपीएमसीमधील उपलब्ध मोकळ्या जागेत दुचाकी व कार चालकांची चाचणी घेतली जाते. याकरिता दोन ८० मीटरच्या ट्रॅकवर कार पुढे नेवून रिव्हर्स मागे आणायला सांगितले जाते. वाहन चालक परवान्यासाठी ही पद्धत अत्यंत दुर्मीळ झाली असून सध्याची रस्त्यावरील परिस्थिती पाहून त्यात सुधाराची गरज निर्माण झालेली आहे. केवळ सरळ मार्गे पुढे मागे कार चालवून दाखवताना प्रत्यक्षात रस्त्यावर चालकाला जे कौशल्य दाखवावे लागते, हे त्याठिकाणी तपासले जात नाही. यामुळे केवळ औपचारिकता म्हणून आरटीओकडून चालकांची चाचणी घेतली जात असल्याचा आरोप आहे. वाहनचालक परवाना मिळण्यापूर्वी शहरांतर्गतचे रस्ते व महामार्गावर दिवसा अथवा रात्री वाहन चालवताना कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल याचीही माहिती असणे आवश्यक आहे.
वाहनचालक परवान्याची चाचणी प्रक्रिया रस्त्यावरील परिस्थितीला आधारित असली पाहिजे. मात्र, थोड्या फार पैशांसाठी आरटीओकडून कोणाच्याही हाती चालक परवाना टेकवला जात आहे. यामुळे वेगवेगळे रस्ते, महामार्ग यावरील परिस्थितीपासून अज्ञान अपरिपक्व चालकांमुळे अपघातांच्या घटना घडत आहेत.
- विनय मोरे, प्रवक्ता, सारथी सुरक्षा