सगळ्या आव्हानांसाठी नौदल सज्ज - गिरीश लुथ्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 06:28 AM2017-08-12T06:28:52+5:302017-08-12T06:28:52+5:30
कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता नौदलात आहे. परिणामी, आदेश मिळाल्यास कोणत्याही क्षणी सगळ्या आव्हानांसाठी नौदल सज्ज असल्याचा विश्वास, नौदलाच्या पश्चिम विभागाचे व्हाइस अॅडमिरल गिरीश लुथ्रा यांनी व्यक्त केला.
मुंबई : कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता नौदलात आहे. परिणामी, आदेश मिळाल्यास कोणत्याही क्षणी सगळ्या आव्हानांसाठी नौदल सज्ज असल्याचा विश्वास, नौदलाच्या पश्चिम विभागाचे व्हाइस अॅडमिरल गिरीश लुथ्रा यांनी व्यक्त केला. देशाच्या ७०व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मेरीटाइम बोर्ड आणि भारतीय नौदलातील अधिकारी यांच्या संवाद कार्यक्रमात, लुथ्रा शुक्रवारी कफ परेड येथे बोलत होते.
आयएमसी चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री व आयएमसी महिला विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी नेव्हल वाइव्ज वेल्फेअर असोसिएशन (नावा) पश्चिम विभागाच्या अध्यक्षा प्रीती लुथ्रा, आयएमसी महिला विभागाच्या अध्यक्षा नयनतारा जैन, आयएमसी चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष डॉ. ललित कनोडिया उपस्थित होते. देशाच्या सागरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ‘शॉर्ट टर्म’ आणि ‘लाँग टंर्म’ योजना तयार केलेली आहे. देशातील सागरी किनाºयावरील सद्य आणि संभाव्य धोका लक्षात घेत, या योजना तयार करण्यात आल्या आहेत. नौदलाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी सरकारने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर, सागरमाला प्रकल्प, सायबर हल्ला, देशांतर्गत होणारे सागरी सराव अशा विविध विषयांसंबंधी लुथ्रा यांनी माहिती दिली.
देशभर कार्यरत असलेल्या नेव्हल वाइव्ज वेल्फेअर असोसिएशन (नावा) तर्फे राबविलेल्या विविध योजनांची माहिती पश्चिम विभागीय अध्यक्षा प्रीती लुथ्रा यांनी दिली. आयएमसी महिला विभागाच्या अध्यक्षा नयनतारा जैन म्हणाल्या की, ‘महिला विभाग देशाचे संरक्षण अबाधित राखण्यासाठी तत्पर असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी कार्यरत आहे. देशाच्या संरक्षणासाठी महिलांप्रमाणे धैर्याने राहा, स्वत: विश्वास ठेवा, देश आणि समाजाला सामर्थ्यशाली बनविण्यासाठी त्याग करा,’ असेही त्यांनी सांगितले.
‘वूमन इन व्हाइट’चा सन्मान : नौदलात महिला सर्व जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करत आहेत. नौदलातील आयएनएस शिक्रावरील स्टाफ आॅफिसर लेफ्टनंट मीनाक्षी पांडेचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. नौदलाच्या पश्चिम विभागाचे व्हाइस अॅडमिरल गिरीश लुथ्रा आणि ‘नावा’च्या पश्चिम विभागीय अध्यक्षा प्रीती लुथ्रा यांच्या हस्ते मीनाक्षी यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी मीनाक्षीने नौदलातील तिच्या अनुभवांना उजाळा दिला.