नवी मुंबई : मुंबई, नवी मुंबई परिसरात वाहनचोरी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल २१ वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये १७ मोटारसायकलींचा समावेश आहे. नवी मुंबई पोलिसांनी शहरात होणाऱ्या वाहनचोरीचे गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. पोलीस आयुक्त प्रभात रंजन व गुन्हे शाखेचे उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. नवीन पनवेलमधील डी मार्टजवळ चोरी केलेली मोटारसायकल घेऊन एक जण येणार असल्याची माहिती युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ यांच्या पथकाला मिळाली होती. बुधवारी या परिसरात सापळा रचून पोलिसांनी श्याम खोतकर याला अटक केली आहे. आरोपी मूळचा आंध्र प्रदेशमधील रहिवासी आहे. त्यांच्याकडे सापडलेली मोटारसायकल कामोठेमधून चोरी केली असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय त्याने साई मंदिर परिसरात लपवून ठेवलेल्या तीन मोटारसायकलीही जप्त केल्या आहेत. मोर्बे गावामध्येही एक व्यक्तीकडे चोरीच्या मोटारसायकली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून समाधान गडगे याला अटक केली असून, त्याच्याकडून दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. या दोन आरोपींव्यतिरिक्त पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या माधव गौडा या गुन्हेगारांकडून १ सुमो जीप, १ बोलेरो जीप हस्तगत केली आहे. पोलिसांनी तीनही आरोपींकडून एकूण २ चारचाकी व ६ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. याशिवाय पनवेल व खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये चोरीची वाहने उभी केली असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे दोन्ही ठिकाणी तपासणी केल्यानंतर ११ मोटारसायकली, २ रिक्षा मिळाल्या आहेत. एकूण २१ वाहने सापडली आहेत. रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये चोरीची वाहने उभी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कारवाईमध्ये सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे, अधिकराव पोळ, किरण भोसले, सुभाष पुजारी व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
वाहनचोरी करणारी टोळी गजाआड
By admin | Published: October 16, 2015 2:31 AM