द्रोणागिरी नोड विकासाच्या टप्प्यात; सिडकोचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:56 PM2019-09-23T22:56:18+5:302019-09-23T22:56:25+5:30
गृहप्रकल्पांसह पायाभूत सुविधांवर भर
नवी मुंबई : विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिलेल्या द्रोणागिरी नोडच्या विकासावर सिडकोने आता आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मागील वर्षभरापासून या विभागात विविध पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर सिडकोने भर दिला आहे. इतकेच नव्हे, तर गेल्या वर्षी जाहीर केलेल्या १५ हजार घरांच्या महाप्रकल्पातील अडीच हजार घरे द्रोणागिरीमध्ये उभारली जात आहेत. तसेच अलीकडेच जाहीर झालेल्या ९ हजार घरांच्या योजनेत द्रोणागिरी नोडमध्ये जवळपास दीड हजार घरे प्रस्तावित आहेत. त्यामुळे येत्या काळात द्रोणागिरीचा झपाट्याने विकास होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
द्रोणागिरी नोडची घोषणा केल्यानंतर सिडकोकडून या नोडच्या विकासासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. पायाभूत सुविधांच्या बाबतीत सुरुवातीपासून उदासीनता बाळगण्यात आली. त्यामुळे या नोडचा अपेक्षित विकास होऊ शकला नाही. याचा फटका येथील गुंतवणूकदार आणि विकासकांना बसला. जमिनींतील कोट्यवधींची गुंतवणूक अडकून पडली. पायाभूत सुविधाच नसल्याने मालमत्तेकडे ग्राहकांनी पाठ फिरविली. याचा परिणाम म्हणून अनेक गृहप्रकल्प अर्धवट अवस्थेत बंद पडले. साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या भूखंडांचेही नियोजन चुकले. वाटप करण्यात आलेल्या बहुतांशी भूखंडांचा खारफुटीच्या क्षेत्रात समावेश झाल्याने या भूखंडांच्या विकासालासुद्धा खोडा झाला. परिणामी, मागील १० वर्षांत द्रोणागिरीतील विकासकामे ठप्प पडली. परंतु सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे हाती घेताच लोकेश चंद्र यांनी द्रोणागिरी नोडच्या विकासावर आपले लक्ष केंद्रित केले.
या विभागाचा दौरा करून रखडलेल्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर या क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. इतकेच नव्हेतर, १५ हजार घरांच्या गृह योजनेतील जवळपास अडीच हजार घरे द्रोणागिरीमध्ये निर्माण करण्याचे ठरविले. त्यानुसार कार्यवाहीसुद्धा करण्यात आली. या घरांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पुढील एक-दोन वर्षांत या घरांचा ताबासुद्धा दिला जाईल. आता नव्याने जाहीर करण्यात आलेल्या योजनेतील जवळपास दीड हजार घरे द्रोणागिरीमध्ये बांधली जाणार आहेत.