पोलिसांच्याही कामी आला ड्रोन
By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 13, 2025 07:04 IST2025-03-13T07:04:34+5:302025-03-13T07:04:43+5:30
भविष्यात सीसीटीव्हीइतकेच महत्त्व ड्रोनला मिळून ते पोलिसांच्या हातात येण्याची शक्यता

पोलिसांच्याही कामी आला ड्रोन
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : आकाशात उडणारे ड्रोन पाहून अनेक जण त्यावर शंका घेऊन पोलिसांकडे तक्रार करतात. मात्र, हेच ड्रोन असाही उपयोगी पडू शकतो, याची प्रचिती पोलिसांनाही आली. त्यामुळे भविष्यात सीसीटीव्हीइतकेच महत्त्व ड्रोनला मिळून ते पोलिसांच्या हातात येण्याची शक्यता आहे.
गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपी वाशी परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला असतानाच गुन्हेगारांना पोलिसांची चाहुल लागली. यामुळे गुन्हेगार धूम ठोकत असताना पोलिसांच्याही गाड्या त्यांच्या मागे धावत होत्या. यात गुन्हेगारांच्या गाडीने दोन, तीन अपघातदेखील केले. यामध्ये गाडी बंद पडल्याने गुन्हेगारांनी थेट धावत खाडीकिनारी भागातील खारफुटीत शिरकाव केला. अशा वेळी दाट झाडी आणि दलदलीत गुन्हेगारांचा शोध घ्यायचा कसा? असा पोलिसांना प्रश्न पडलेला असतानाच ड्रोन मदतीला आले. जमिनीवरून नाहीतर आकाशातून गुन्हेगारांच्या हालचाली हेरायचे ठरवून परिसरात ड्रोन उडवण्यात आला. त्यामध्ये एक गुन्हेगार दिसून येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांचा कट उघड झाला.
लॉकडाऊनमध्ये मोठा वापर
घरफोडीच्या गुन्ह्यातले हे आरोपी दरोड्याच्या तयारीत वाशीत आले होते. यापूर्वी लॉकडाऊन काळात संचारबंदी झुगारून फिरणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांकडून ड्रोनचा वापर झाला होता. परंतु, त्यानंतर ड्रोनचा गुन्हेगार शोधण्याचाही वापर होऊ शकतो, याचा विचारही पोलिसांकडून झाला नसावा.
सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात अनेकदा गुन्हेगार निसटण्याचे प्रकारही घडतात. अशा वेळी पळणाऱ्या गुन्हेगाराचा, गाडीचा मागोवा घेण्यासाठी ड्रोनद्वारे त्यांचा पाठलाग केला जाऊ शकतो.
हे ३ मार्चला वाशीत झालेल्या चोर पोलिसांच्या धरपकडमध्ये सिद्धही झाले आहे. यामुळे येत्या काळात पोलिसांच्या हाती ड्रोनचा रिमोट दिसल्यास त्याचे आश्चर्य वाटणार नाही.