फ्लेमिंगोंना आता ड्रोनचा धोका, नॅटकनेक्टची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
By नारायण जाधव | Published: May 31, 2024 07:35 PM2024-05-31T19:35:54+5:302024-05-31T19:37:22+5:30
पाणथळींच्या परिसरात ड्रोनला मनाई करण्याची मागणी
नवी मुंबई : विमाने आणि दगडफेक करणाऱ्यांनंतर आता काही लोकांकडून फ्लेमिंगो पाहण्यासाठी तसेच त्यांच्या हालचालींचे शूटिंग करण्यासाठी ड्रोनचा वापर होऊ लागला आहे. यामुळे नवी मुंबईच्या एनआरआय आणि डीपीएस तलाव क्षेत्रातील फ्लेमिंगोच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर येथील पर्यावरणप्रेमींनी याबाबत मुख्यमंत्री आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. दहा दिवसांपूर्वी एमिरेट्सचे विमान मुंबई विमानतळावर उतरत असताना अपघात होऊन तब्बल ३९ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला होता.
अलीकडे, या गुलाबी पक्ष्यांना जवळून पाहण्यासाठी पाणथळ प्रदेशात येणाऱ्या पक्षीप्रेमींसह अनेक नागरिक फ्लेमिंगोंच्या थव्यांवर ड्रोन उडवत आहेत. काहीवेळा हे ड्रोन पक्ष्यांपेक्षा फक्त एक किंवा दोन फूट उंचीवर उडवले जातात, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
ड्रोनचे प्रोपेलर ब्लेड गुलाबी पक्ष्यांना घातक
वन्यजीव संरक्षण कायदा - १९७२ अंतर्गत येणाऱ्या नाजूक पक्ष्यांना ड्रोनचे धारदार, फिरणारे प्रोपेलर ब्लेड मोठी दुखापत करू शकते. सर्वांत वाईट आणि त्याहूनही धोकादायक गोष्ट म्हणजे ड्रोन, फ्लेमिंगोंच्या उड्डाणावेळीही त्यांचा मागोवा घेतात, असे नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले. यामुळे फ्लेमिंगो झोनपासून ड्रोनच्या वापरास मनाई करावी, त्यासाठी सरकारने आदेश द्यावेत. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे पोलिस महासंचालक, नवी मुंबई पोलिस आयुक्त आणि मॅन्ग्रोव्ह सेल यांनादेखील ई-मेल पाठवला आहे.
असुरक्षित ड्रोन संस्कृतीस आळा बसायला हवा
‘टीएस चाणक्य फ्लेमिंगो झोनमध्ये मी बऱ्याचदा ड्रोन उडतानाची त्रासदायक दृश्ये पाहिली आहेत,’ असे सेव्ह फ्लेमिंगोज अँड मँग्रोव्हज फोरमच्या रेखा सांखला म्हणाल्या. ते उडवणाऱ्यांना हे माहीत नसेल की त्यांचे ड्रोन या गुलाबी पक्ष्यांचा जीव धोक्यात आणतात. अशा लोकांना शिक्षित करण्याचे आवाहन केले. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात भरतीच्या पाण्याची पातळी वाढल्यावर टीएस चाणक्य, एनआरआय आणि डीपीएस फ्लेमिंगो झोनमध्ये उतरणाऱ्या पक्ष्यांना ड्रोनमुळे त्रास होतो, असे सांगून पक्षीप्रेमी ज्योती नाडकर्णी म्हणाल्या की, ‘असुरक्षित ड्रोन संस्कृती विषाणूप्रमाणे पसरत असून, तिला आत्ताच आळा घातला पाहिजे.’