दुष्काळाचा फटका; जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये झाली वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 01:14 AM2019-06-01T01:14:52+5:302019-06-01T06:17:55+5:30
राज्यासह देशाच्या विविध भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी डाळी व कडधान्याचे पीकही समाधानकारक झाले नाही. याचा परिणाम बाजारपेठेवर जाणवू लागला आहे
नवी मुंबई : तीव्र उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. प्रतिदिन वाढणाऱ्या उकाड्यासोबत अन्नधान्याच्या किमतीही वाढू लागल्या आहेत. गहू, ज्वारीसह डाळी व कडधान्याच्या दरामध्ये वाढ झाली असून, त्यामुळे ग्राहकांच्या किचनचे बजेट बिघडू लागले आहे. घाऊक बाजारपेठेमध्ये मूग व मूगडाळीच्या दरामध्ये प्रतिकिलो पाच रुपयांची वाढ झाली आहे.
राज्यासह देशाच्या विविध भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी डाळी व कडधान्याचे पीकही समाधानकारक झाले नाही. याचा परिणाम बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. गत पाच वर्षे मुंबईमध्ये अन्नधान्याच्या किमती स्थिर होत्या; परंतु यावर्षी बाजारभावामध्ये सातत्याने चढ-उतार होऊ लागले आहेत. मेच्या सुरुवातीला आवक वाढल्यामुळे बाजारभाव स्थिर होते; परंतु सद्यस्थितीमध्ये मार्केटमधील आवक घसरू लागली असून भाव वाढत आहेत. गत महिन्यामध्ये रोज सरासरी १८०० ते १९०० टन गव्हाची आवक होत होती. सद्यस्थितीमध्ये फक्त ४०० ते ८०० टन आवक होऊ लागली आहे. भाव २१ ते २८ रुपयांवरून प्रतिकिलो २२ ते २९ झाले आहेत. उन्हाळ्यामध्ये बाजारातील मागणी कमी होत असल्याने प्रत्येक वर्षी दर घसरतात; पण या वेळी २२ ते २९ रुपये किलो दराने बाजरी विकली जात असून प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढ झाली आहे. उन्हाळ्यामध्ये ज्वारीला मागणी वाढत असते. याच महिन्यामध्ये नागरिक पुढील काही महिन्यांसाठीचा साठा करून ठेवत असतात. यामुळे मार्केटमध्ये रोज १०० ते १५० टन ज्वारीची आवक होत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून ज्वारी विक्रीसाठी येत असून बाजारभाव प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढले असून, घाऊक बाजारपेठेमध्ये प्रतिकिलो २७ ते ४० रुपयांचा भाव मिळू लागला आहे. ज्वारीला समाधानकारक भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
मुंबईच्या धान्य मार्केटमध्ये सर्वाधिक विक्री तांदळाची होत असते. पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश व देशाच्या इतर परिसरामधूनही तांदूळ येथे विक्रीसाठी येत आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीला सरासरी २५०० टन आवक होत होती. या आठवड्यामध्ये त्यामध्ये घसरण होऊन सरासरी फक्त १४०० ते १८०० टन आवक होत आहे. २७ ते ३९ रुपये किलो दराने विकला जाणारा तांदूळ सद्यस्थितीमध्ये २८ ते ४० रुपये दराने विकला जात आहे.
डाळी व कडधान्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. दुष्काळामुळे राज्यामध्ये पुरेसे उत्पादन झाले नाही. आयात बंद असल्यामुळे मागणी व पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होऊ लागली आहे. मार्केटमध्ये सर्वाधिक सरासरी १५० टन आवक तुरडाळीची होत आहे. मेच्या सुरुवातीला ६० ते ८२ रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या तुरडाळीच्या दरामध्ये वाढ होऊन प्रतिकिलो ६२ ते ८५ रुपये किलो झाले आहेत. ६५ ते ९० रुपये किलो दराने विकला जाणारा मूग ७० ते ९० रुपये झाला असून, मूगडाळीचे दर ६६ ते ९० वरून ७० ते ९० झाले आहेत. एक महिना मार्केटमध्ये तेजी कायम राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
खजूरला मागणी वाढली
मसाला मार्केटमधील आवकही कमी होवू लागली आहे. उन्हाळा असल्यामुळे मार्केटमध्ये नारळाची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. सद्यस्थितीमध्ये सरासरी २५० ते ३०० टन नारळ विक्रीसाठी येत असून, बाजारभाव ८०० ते ३२०० रुपये क्विंटलवरून ६५० ते ३००० रूपये क्विंटल झाले आहेत. रमजान महिना सुरू असल्यामुळे खारीक व खजूरला मागणी वाढली आहे. रोज ३० टन आवक होत आहे. खारीक दर १२० ते २४० रुपयांवरून १३० ते ३०० रुपये किलोवर गेले आहेत.