कर्नाळा अभयारण्यात दुष्काळाच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:19 PM2019-02-24T23:19:27+5:302019-02-24T23:19:44+5:30
तलावातील पाण्याची पातळी खालावली : पाण्यासाठी पक्ष्यांची भटकंती, वनविभागाकडून उपाययोजना
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाळा अभयारण्यात आतापासूनच दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या आहेत. येथील तलावाच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे वनविभागाने अभयारण्यातील पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी पाण्याच्या कुंड्या ठेवल्या आहेत.
या अभयारण्यात रानखाटीक, ठिपकेवाला सातभाई, कस्तूर, शिंपी, गिधाड, मुनिया, नाचन, सुगरण, बया, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, शामा, मोर, फुलटोचा, पावशा, बिहरा, कापशी घार, नीळकंठ पोपट, सूर्यपक्षी, हरियल आदी १३४ पक्ष्यांच्या स्थानिक प्रजाती आहेत. तर स्थलांतरीत झालेल्या पक्ष्यांच्या ३८ प्रजाती आहेत. सध्या वातावरणात उष्मा वाढला आहे. उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे, त्यामुळे तहान भागविण्यासाठी येथील पक्ष्यांना भटकंती करावी लागत आहे. या अभयारण्यात पक्षी व वन्य प्राण्यांसाठी तीन तलाव निर्माण करण्यात आले आहेत.
या तलावाच्या पाण्यावर येथील वन्यजीव आपली तहान भागवितात; परंतु गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्याने सध्या या तलावांची पातळी खालावली आहे. पुढील काही दिवसांत हे तिन्ही तलाव निर्जल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील वन्यजीवांची पाण्याअभावी होरपळ होणार आहे. त्यामुळे वनविभागाने वनपरिक्षेत्रात ठिकठिकाणी पाण्याच्या २७ कुंड्या ठेवल्या आहेत.
या कुंड्या ५० ते ६० लीटर क्षमतेच्या आहेत, त्याकरिता चार बीट नेमण्यात आले आहेत. एका बीटमध्ये पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दर १५ दिवसांनी हे कर्मचारी या कुंडीतील पाण्याचा आढावा घेतात. एकूणच अभयारण्यातील पक्षी व प्राण्यांची पाण्याअभावी परवड होऊ नये, या दृष्टीने उपाययोजना आखण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी पी.पी. चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली.