ड्रग्स माफिया महिलेला डायघरमधून अटक; कोपरखैरणे पोलिसांची कारवाई
By सूर्यकांत वाघमारे | Published: March 5, 2024 07:40 PM2024-03-05T19:40:36+5:302024-03-05T19:40:39+5:30
कोपरखैरणेतील ३१ लाखाच्या ड्रग्स प्रकरणातील पोलिसांना चकमा देणाऱ्या रुक्साना अन्सारी हिला पोलिसांनी अटक केली आहे.
नवी मुंबई: कोपरखैरणेतील ३१ लाखाच्या ड्रग्स प्रकरणातील पोलिसांना चकमा देणाऱ्या रुक्साना अन्सारी हिला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या छाप्याची चाहूल लागताच तिने अंधारात धूम ठोकली होती. यामुळे पोलीस तिच्या मागावर असताना शीळ डायघर परिसरात लपून बसल्याचा माहितीवरून सोमवारी त्याठिकाणी छापा टाकून तिला अटक करण्यात आली.
कोपर खैरणे सेक्टर १९ येथील नॅशनल अपार्टमेंटमध्ये रुक्साना अन्सारी हिच्याकडून राहत्या घरात ड्रग्स विक्रीचे रॅकेट चालवले जात होते. यामुळे परिसरात रात्री अपरात्री गुन्हेगार तरुणांचा वावर होत होता. त्यानुसार तिचे ड्रग्स विक्रीचे रॅकेट कायमचे नष्ट करण्याच्या उद्देशाने १७ फेब्रुवारीला कोपर खैरणे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील यांनी अमली पदार्थ विरोधी पथकाच्या मदतीने रात्रीच्या सुमारास त्याठिकाणी छापा टाकला होता. मात्र पोलिसांनी इमारत घेरल्याची चाहूल लागताच रुक्साना हिने धूम ठोकली होती. यावेळी तिच्या घरातून तिघांना अटक करण्यात आली होती. शिवाय घरातील पंख्यात तसेच वेगवेगळ्या ठिकाणी लपवलेले एकूण ३१ लाख ६० हजार रुपये किमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते.
तर पळून गेलेल्या रुक्साना अन्सारीच्या शोधात देखील कोपर खैरणे पोलिसांचे पथक होते. अखेर ती शीळ डायघर परिसरात एका इमारतीमध्ये लपून राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या पथकाने सोमवारी त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी तिच्या नातेवाईकांकडून प्रतिकार देखील करण्यात आला. एका घराला बाहेरून कुलूप लावून आतमध्ये तिला लपवून ठेवण्यात आले होते. परंतु पोलिसांनी संपूर्ण इमारत पिंजून बंद घरांचीही झाडाझडती घेऊन अखेर तिला बेड्या ठोकल्या.