मोबाइल दुरुस्तीच्या आड ड्रग्ज तस्करी; एपीएमसीत कोट्यवधीचे एमडी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 03:14 PM2023-10-13T15:14:29+5:302023-10-13T15:15:00+5:30
या कारवाईदरम्यान आरोपीकडून १ कोटी १० हजार रुपयांचे एमडी जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवी मुंबई : मोबाइल दुरुस्तीच्या दुकानाआड ड्रग्ज तस्करी करणाऱ्या शामसुद्दीन अब्दुल कादर एटिंगल (२९) याला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई नवी मुंबईच्या अमली पदार्थविरोधी पथकाने एपीएमसी परिसरात केली. या कारवाईदरम्यान आरोपीकडून १ कोटी १० हजार रुपयांचे एमडी जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवी मुंबई शहर नशामुक्त करण्यासाठी पोलिसांनी ड्रग्ज विकणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. या विशेष मोहिमेंतर्गत ड्रग्जविक्री, पुरवठा करणाऱ्यांवर पाळत ठेवत असताना एपीएमसीमधील सतरा प्लाझा परिसरात एक जण ड्रग्ज विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे, सहायक पोलिस आयुक्त गजानन राठोड अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नीलेश धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक कुलदीप मोरे, हवालदार रमेश तायडे यांनी सतरा प्लाझा परिसरात सापळा लावला. त्यावेळी तेथे आलेल्या एका संशयास्पद व्यक्तीला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक किलो ११ ग्रॅम एमडी आढळून आले. या एमडीची किंमत एक कोटी एक लाख १० हजार रुपये असल्याचे निष्पन्न झाले.