खारघरमधून सव्वा कोटीचे अमली पदार्थ जप्त, गुन्हे शाखेची कारवाई
By सूर्यकांत वाघमारे | Published: January 1, 2023 01:22 PM2023-01-01T13:22:16+5:302023-01-01T13:23:41+5:30
थर्टी फर्स्टच्या अनुशंघाने सुरु होती विक्री.
नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी खारघर येथून सव्वा कोटीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये १६ नायजेरियन व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून ८३ लाखाचे हेरॉईन तर २९ लाखाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
थर्टी फर्स्टच्या अनुशंघाने नवी मुंबई पोलिसांकडून शहरातील गैर हालचालींवर चोख नजर ठेवली जात आहे. यादरम्यान खारघर येथील एका रो हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे यांनी गुन्हे शाखेचे एकत्रित पथक तयार केले होते. या पथकाने शुक्रवारी खारघर सेक्टर १२ येथील सी ४९ या रो हाऊसवर नियोजनबद्ध छापा टाकला. त्यावेळी रो हाऊसच्या तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावर जमलेल्या नायजेरियन व्यक्तींनी पोलिसांना धक्काबुकी करून पळून जाण्याचाही प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी देखील बळाचा वापर करून १७ जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये १६ नायजेरियन व्यक्ती असून ६ महिला आहेत. त्यांच्याकडून १ कोटी १३ लाखाचे अमली पदार्थ जप्त केल्याचे उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले. त्यामध्ये २९ लाखाचा गांजा तर ८३ लाखाचे हेरॉईन आहे.
अटक केलेल्या नायजेरियन व्यक्तींमार्फत हे ड्रग्स थर्टी फर्स्टच्या अनुशंघाने शहरात ठिकठिकाणी पुरवले जाणार होते. तत्पूर्वीच गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला. या कारवाईमुळे ड्रग्स रॅकेट मधील मोठे मासे देखील पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विरोधी कारवायांचा धडाका सुरु आहे. त्यावरून आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदभार घेताच पोलीस ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे.