एपीएमसीमधून एक कोटीचे ड्रग्स जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई 

By सूर्यकांत वाघमारे | Published: October 12, 2023 03:09 PM2023-10-12T15:09:52+5:302023-10-12T15:10:15+5:30

नवी मुंबई पोलिसांकडून ड्रग्स विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केल्या जात आहे

Drugs worth one crore seized from APMC; Action of Anti-Narcotics Squad | एपीएमसीमधून एक कोटीचे ड्रग्स जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई 

एपीएमसीमधून एक कोटीचे ड्रग्स जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई 

नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी एपीएमसी परिसरातून १ कोटी रुपये किमतीचे ड्रग्स जप्त केले आहेत. याप्रकरणी गोरेगाव परिसरात मोबाईल दुरुस्तीचे दुकान चालवणाऱ्या एकाला अटक केली आहे. ड्रग्स विक्रीसाठी तो त्याठिकाणी आला असता त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

नवी मुंबई पोलिसांकडून ड्रग्स विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केल्या जात आहेत. त्यासाठी ड्रग्स विक्री, पुरवठा करणाऱ्यावर पाळत  ठेवली जात आहे. त्यानुसार एपीएमसी मधील सतरा प्लाझा परिसरात एकजण ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याद्वारे उपायुक्त अमित काळे, सहायक आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांनी सहायक निरीक्षक निलेश धुमाळ, उपनिरीक्षक कुलदीप मोरे, हवालदार रमेश तायडे आदींचे पथक केले होते.

या पथकाने  मंगळवारी रात्री सतरा प्लाझा परिसरात सापळा रचला होता. त्यामध्ये एका संशयिताला ताब्यात घेतले असता त्याच्या झडतीमध्ये १ किलो ११ ग्रॅम एमडी हा ड्रग्स आढळून आला. त्याची किंमत १ कोटी १ लाख १० हजार रुपये आहे. त्यानुसार शामसुद्दीन अब्दुल कादर एटिंगल (२९) याच्यावर एपीएमसीत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तो गोरेगाव येथे राहणारा असून त्याठिकाणी तो मोबाईलचे सुट्टे भाग विक्रीचे दुकान चालवतो. त्याने हे ड्रग्स कोणाकडून आणले व कोणाला पुरवणार होता याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Drugs worth one crore seized from APMC; Action of Anti-Narcotics Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.