नेरूळमधून सहा लाखांचे अमली पदार्थ जप्त; श्रीमंतीसाठी उच्चशिक्षित तरुण बनला तस्कर
By सूर्यकांत वाघमारे | Published: June 2, 2023 05:05 PM2023-06-02T17:05:16+5:302023-06-02T17:06:23+5:30
पामबीच मार्गालगत नेरुळ सेक्टर १४ येथे एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला पोलिसांना मिळाली होती.
नवी मुंबई - एलएसडी हा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ६ लाख रुपये किमतीचे १ ग्रॅम एलएसडी जप्त करण्यात आले आहे. सदर तरुण आर्किटेक्चर पदवीधर असून झटपट श्रीमंतीसाठी अमली पदार्थांची तस्करी करू लागला होता.
पामबीच मार्गालगत नेरुळ सेक्टर १४ येथे एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे अपर आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बासीतअली सय्यद, उपनिरीक्षक विजय शिंगे, हवालदार रमेश तायडे, महेंद्र अहिरे, अनंत सोनकुळ, रवींद्र कोळी व संजय फुलकर आदींचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी बुधवारी रात्री पामबीच मार्गालगत नेरुळ येथे सापळा रचला होता. यावेळी संशयित वर्णनाचा तरुण त्याठिकाणी आला असता, पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्यामध्ये त्याच्याकडे १ ग्रॅम एलएसडी पेपर हा अमली पदार्थ आढळून आला.
बाजारभावानुसार त्याची किंमत ६ लाख रुपये आहे. याप्रकरणी मोहंमद फैजल खतीब (२७) याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थ घेऊन तो विक्रीसाठी त्याठिकाणी आला होता. मोहंमद याने आर्किटेक्चर मध्ये पदवी घेतलेली असून तो झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न बघत होता. यातूनच त्याने अमली पदार्थ तस्करीचा मार्ग स्वीकारला होता. तो कधीपासून अमली पदार्थांची तस्करी करत होता, तो कोणत्या रॅकेटसोबत जोडला गेला आहे याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.