प्राची सोनवणे, नवी मुंबईराज्यातील दुष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेता यंदा रंगपंचमी पाणी वाया न घालविता साजरी करणे आवश्यक आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाणीबचतीचा संदेश पोहोचविला जात असून, मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. महानगरपालिकेकडून पाणीपुरवठ्यामध्ये साधारणत: ३० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीकपात करण्यात आलेली असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरण क्षेत्रामध्येही यावर्षी कमी पाऊस झाला असल्याने त्यांच्यामार्फतही मोठ्या प्रमाणात पाणीकपात करण्यात आलेली आहे. होळीच्या दिवशी म्हणजेच २३, २४ मार्चला दैनंदिन नियमित पाणीपुरवठ्याव्यातिरिक्त कोणताही अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात येणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी. रंगोत्सव साजरा करताना पाण्याचा अपव्यय आणि अनावश्यक वापर टाळावा, तसेच काळजीपूर्वक पाण्याची बचत करून नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे. रंगोत्सवासाठी पाण्याचे फुगे तयार करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या विकणाऱ्या दुकानदारांवर महापालिकेने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. प्लास्टिक पिशव्या विकणारा विक्रेता आढळल्यास त्या दुकानदाराकडून दंडवसुली करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रंगांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रंगपंचमीला पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवून निसर्गाचा हिरवा रंग परत आणला पाहिजे. प्रत्येकाने एक तरी झाड लावण्याची शपथ घेऊन ग्रीन सिटीसाठी हातभार लावला पाहिजे.- सुनील नाईक, अध्यक्ष, निसर्गप्रेमी फाउंडेशन
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा कोरडी धुळवड !
By admin | Published: March 23, 2016 2:27 AM