दिवाळीसाठी सुकामेवा प्रिय; बदाम, पिस्ता, अक्रोड स्वस्त; APMCमध्ये आवक वाढली
By नामदेव मोरे | Published: October 31, 2023 08:46 AM2023-10-31T08:46:00+5:302023-10-31T08:48:17+5:30
काजू, अंजीर, मनुक्याचा भाव चढाच
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : दिवाळीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये सुकामेव्याची आवक वाढली आहे. काजू, अंजीर व मनुके वगळता इतर सुकामेव्याचे दर गतवर्षीच्या तुलनेमध्ये कमी असल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. यावर्षीही मिठाईपेक्षा पौष्टिक सुकामेव्याला ग्राहकांची पसंती लाभू लागली आहे.
गणपती, दसऱ्यानंतर यावर्षी दिवाळीही धूमधडाक्यात साजरी होणार आहे. दिवाळी काही दिवसांवर आल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये आवक वाढली आहे. सोमवारी मार्केटमध्ये वाहनांची संख्या वाढल्यामुळे चक्का जामची स्थिती निर्माण झाली होती. दिवसभरात जवळपास २०० टन सुकामेव्याची आवक झाली आहे. कोरोनापासून नागरिकांना आरोग्याचे महत्त्व लक्षात आले आहे. गोड मिठाई मधुमेह, रक्तदाबासह इतर आजारांना आमंत्रण देत असल्यामुळे ग्राहकांकडून आता सुकामेव्याला पसंती दिली जात आहे. यावर्षी बाजारभावही नियंत्रणात असल्यामुळे ग्राहकांकडून खरेदीला पसंती मिळू लागली आहे.
सुकामेव्याचे तुलनात्मक दर
- वस्तू २०२२ २०२३
- अंजीर ६०० ते ८०० ८०० ते १३००
- काजू ५०० ते ६०० ४०० ते ८००
- बदाम ६०० ते ८०० ६५० ते ७५०
- खजूर ८० ते १५० ८० ते १२०
- खारीक १४० ते २४० १२० ते ३००
- मनु १२० ते २०० १५० ते २२०
- पिस्ता १००० ते १६०० ८६५ ते ११००
- आक्रोड १००० ते १५०० ५०० ते ९००
सर्वसामान्य ग्राहकांनी दिवाळीसाठी सुकामेवा खरेदीस सुरुवात केली नसली तरी मिठाई दुकानदार व इतर किरकोळ दुकानदारांची खरेदी सुरू झाली आहे. मसाला मार्केचे उपसचिव कैलास सावळकर यांनी सांगितले की, सोमवारपासून आवक वाढू लागली असून, पुढील ठवडा हंगाम राहील.