नवी मुंबई : स्वच्छता अभियानानिमीत्त नवी मुंबई महानगरपालिकेने १५ शाळांमध्ये ड्राय वेस्ट बँक तयार केली आहे. २७७१ विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. घरातील सुका कचरा पिशवीमध्ये भरून तो शाळेतील संकलन केंद्रात साठवला जातो. सहभागी विद्यार्थ्यांना पाॅईंट्स दिले जात असून २ हजार पेक्षा जास्त पॉईंट्स मिळणारांना वेस्ट वॉरिअर प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येत आहे. बेलापूर व वाशी विभागातील शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. विद्यार्थ्यांना सुका कचरा संकलीत करण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप केले जाते. त्यांनी जमा केलेल्या प्लास्टीक बॉटल, चिप्स व चॉकलेट कव्हर, काचेच्या बाटल्या असा सुका कचरा आठवड्यातून एकदा ठरविण्यात आलेल्या दिवशी शाळेत आणला जातो. या कचऱ्यासाठी विद्यार्थ्यांना पॉईंट्स दिले जातात. पेट बॉटलला २, चिप्स, चॉकलेटच्या दहा कव्हरला १, घरगुती प्लास्टीकला २, काचेच्या बॉटलला २, ट्रेट्रा पॅक, टिनल २ पॉईंट्स दिले जातात. प्रत्येक १००, २०० व ५०० पॉईंट्स नंतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहनात्मक शैक्षणिक वस्तुंचे वाटप केले जाते. २ हजार पेक्षा जास्त पॉईंट्स मिळणारांना वेस्ट वॉरीअर प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येत आहे. सीवूडमधील एस एस आयस्कूल मधील शुभम पाल याने २५०० पॉईंट्स मिळविले आहे. दिवाळे महानगरपालिका शाळा क्रमांक २ येथील एकता काळे हिने २०२५ व वाशी गाव शाळेतील वंश शिंदे याने ७०० पॉईंट्स मिळविले आहेत. या विद्यार्थ्यांना आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ, घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे उपस्थित होते. हा उपक्रम शहरातील इतर शाळांमध्येही सुरू करण्यात येणार आहे.
नवी मुंबईमधील शाळांमध्ये ड्राय वेस्ट बँक, २७७१ विद्यार्थ्यांचा सहभाग
By नामदेव मोरे | Published: February 13, 2024 4:42 PM