मयूर तांबडे / पनवेलपनवेलमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून त्यामुळे वादाचा प्रसंग उद्भवत आहे. टंचाईची झळ रहिवाशांना सोसावी लागत असून, काही ठिकाणी कमी दाबाने तर काही सोसायट्यांमध्ये पाणीच न मिळल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पनवेल नगरपालिकेचे आता महानगरपालिकेत रूपांतर झाले असले, तरी ही शहरातील पाणीसमस्या अद्याप जैसे थेच आहे. एप्रिल-मे महिन्यात टंचाई जाणवू नये, म्हणून यंदा फेब्रुवारी महिन्यापासून महापालिकेने दिवसाआड पाणी सुरू केले आहे. गतवर्षी १५ फेब्रुवारीला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी दिवसाला सुमारे २६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. पनवेल पालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणामधून ८ एमएलडी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) १० ते १२ एमएलडी व औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) ८ एमएलडी पाणी घ्यावे लागते. मात्र, सद्यस्थितीत पनवेलकरांना दिवसाआड केवळ १८ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. देहरंग धरणातून पनवेलकराना पाणीपुरवठा केला जात नसला तरीदेखील एमजेपीची पाइपलाइन फुटली किंवा शटडाऊन घेतला, तर या धरणातून १० ते ११ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. इतर वेळी एमजेपीकडून ११ एमएलडी, एमआयडीसीकडून ६ एमएलडी व सिडकोकडून१ एमएलडी असा दिवसाआड १८ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.पनवेल नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले असल्याने पुरेसे पाणी पुरवेल, अशी आशा शहरवासीयांना होती. मात्र, ती व्यर्थ ठरली आहे. गाढेश्वर धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी गढूळ पाणीपुरवठा होत आहे. गढूळ पाणीपुरवठ्यामुळे नागरिक संतापले आहेत. हळूहळू पाण्याची समस्या भीषण स्वरूप धारण करणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. २०११च्या जनगणनेनुसार पनवेलची लोकसंख्या १ लाख ११ हजार ९०६ आहे. सद्यस्थितीत पनवेलमध्ये ६४२० पाणी कनेक्शन असून, १ हजार ६९ जणांकडे पाण्याचे मीटर बसविण्यात आलेले आहेत. महापालिकेतर्फे काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठादेखील सुरू करण्यात आला आहेत. ज्या ठिकाणी पाणी पोहोचत नाही, त्या ठिकाणी महापालिकेकडून टँकर पाठविण्यात येत आहेत. दिवसाला जवळपास २५ ते ३० टँकर पाठविले जात आहेत. टँकरसाठी ज्यांची मागणी असेल त्यांच्याकडून अर्ज घेऊन त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. गढूळ पाण्यासंदर्भात काही तक्र ारी असून त्याचा तपास सुरू आहे. पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल एवढे पाणी गाढेश्वर (देहरंग) धरणात शिल्लक आहे. -रामदास तायडे, पाणीपुरवठा अधिकारी, पनवेल महापालिका एक दिवसाआड पाणी येतेय. टँकर मागवावा लागतो. टँकरचे पाणी पिण्यासाठी वापरल्यामुळे आजार होतात. त्यामुळे पिण्यासाठी पुन्हा वेगळ्या पाण्याच्या बाटल्या घ्या. हा सगळा त्रास प्रॉपर्टी टॅक्स, पाणीपट्टी वेळेवर भरल्यानंतरही किती त्रास सहन करायचा? - भक्ती जोशी, पनवेल, रहिवासी
दिवसाआड पाण्यामुळे पनवेलकर हैराण
By admin | Published: March 26, 2017 5:07 AM