कोपरखैरणेतील होल्डिंग पॉण्डवर डेब्रिजचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2015 01:03 AM2015-08-25T01:03:29+5:302015-08-25T01:03:29+5:30
कोपरखैरणेतील होल्डिंग पॉण्डच्या परिसरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. काही भागात तर चक्क खारफुटीवर
नवी मुंबई: कोपरखैरणेतील होल्डिंग पॉण्डच्या परिसरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. काही भागात तर चक्क खारफुटीवर डेब्रिजचे ढीग पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा डेब्रिज माफियांनी तोंड वर काढल्याचे दिसून आले आहे.
वाशी-कोपरखैरणे मार्गावरील कलश उद्यान सोसायटीच्या समोरील बाजूला विस्तीर्ण होल्डिंग पॉण्ड आहे. मागील अनेक वर्षांत या पॉण्डची साफसफाई न झाल्याने त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. खारफुटीची बेसुमार वाढ झाली आहे. आतील गाळ उपसण्यासठी काही प्रमाणात खारफुटीची तोड करावी लागणार आहे. मात्र त्यासाठी पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळत नसल्याने पॉण्डची दुरवस्था झाली आहे. महापालिकेने सुरक्षेच्या कारणास्तव पॉण्डच्या दोन्ही प्रवेशद्वारावर लोखंडी फाटक लावले आहे. मध्यंतरी या ठिकाणी सुरक्षा रक्षकही तैनात होते. मात्र आता हे सुरक्षा रक्षक दिसेनासे झाले आहेत. प्रवेशद्वाराचे गेटही सदैव उघडेच असते. त्यामुळे डेब्रिज माफियांचे फावले आहे. सर्रासपणे येथे डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या केल्या जात आहेत. त्यामुळे खारफुटीची नासाडी होत आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाकडून या प्रकाराकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.