कामोठ्यात गटारांवर झाकणे नसल्याने होताहेत अपघात
By admin | Published: March 22, 2016 02:30 AM2016-03-22T02:30:30+5:302016-03-22T02:30:30+5:30
कामोठे वसाहत ही समस्यांची आगर मानले जाते. अडचणी, प्रश्न आणि समस्य सोडून दुसरा विषयच येथे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सिडकोने पावसाच्या पाण्याचा निचरा
अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली
कामोठे वसाहत ही समस्यांची आगर मानले जाते. अडचणी, प्रश्न आणि समस्य सोडून दुसरा विषयच येथे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सिडकोने पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च करून आरसीसी गटारे बांधली आहेत. मात्र या गटारांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. येथील गटारांवरील झाकणे गायब झाली आहेत. त्यामुळे गटारात माती, कचरा, प्लास्टिकचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याबाबत सिडकोकडून प्रभावी उपाययोजना करण्यात येत नसल्याने कामोठेकरांची ओरड सुरू आहे.
कामोठेत एकूण ४४ सेक्टर असून, त्यापैकी काही सेक्टर विकसित झाले तर ठरावीक सेक्टर विकसित करण्याचे काम सुरू आहे. ज्या वेळी साडेबारा टक्के भूखंडावर कामोठे येथे इमारती उभारण्यात आल्या. त्यावेळी रस्ते, नाले, पावसाळी गटारे, मलनिस्सारण वाहिन्या नव्हत्या. त्यामुळे सुरुवातीला या ठिकाणी ये-जा करणे जिकिरीचे होते. वारंवार पाठपुरावा केल्यामुळे सिडकोने कामोठे वसाहतीत रस्ते विकसित केले. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आरसीसीची पावसाळी गटारे बांधली. सुमारे ५० कि.मी.पेक्षा जास्त लांबीच्या या गटारांकरिता प्राधिकरणाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहे. त्या गटारावर पेव्हर ब्लॉक टाकून त्या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी पदपथ विकसित करण्यात आले आहेत. मात्र या गटारांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. सेक्टर २० मधील बालाजी हाइट्स इमारतीसमोरील पावसाळी गटारे उघडी आहेत. त्यावर स्लॅब तुटला असल्याने आतमधील विजेची वायर बाहेर आली आहे. बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडावरील डेब्रीज नाल्यात जात आहे. सेक्टर ६ मधील शिवसागर इमारतीसमोरील गटारावरील झाकणे गायब झाली आहेत. त्यामुळे त्यात कचरा, माती आणि प्लास्टिकच्या पिशव्यात जात आहेत. साईप्रेम इमारतीजवळ सेक्टर ३४ मध्येही परिस्थिती वेगळी नाही. याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी एक कुत्री आणि तिचे पिल्लं गटारात अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांना चार तासांनंतर या कुत्र्यांना बाहेर काढण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले होते.
सेक्टर ३४ येथे तुळशी सोसायटी आहे. या ठिकाणी झाकणे गायब झाली आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील पावसाचे पाणी गटारात जाण्याकरिता होल आहेत, ते सुद्धा बुजून गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. सेक्टर १२, पुष्पसंगम सोसायटीच्या बाजूला पदपथावर चिकन-मटण विके्र ते बेकायदा व्यवसाय करतात. येथे गटारे उघडी असल्याने मटण विक्रे ते टाकाऊ माल गटारात टाकत असल्याच्या अनेक तक्र ारी येत आहेत. सुषमा पाटील विद्यालय, परिसरातील गटारे झाकणाविनाच आहेत.
>कामोठे वसाहतीत काही ठिकाणी झाकणे नाहीत. त्याबाबत आम्ही लवकरच सर्वेक्षण करणार आहेत. आमच्याकडे झाकणे सुध्दा उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी झाकणे नाहीत, तिथे ताबडतोब बसविण्यात येतील. त्याचबरोबर नादुरुस्त गटारे दुरुस्त करून देण्यात येतील.
- विलास बनकर,
कार्यकारी अभियंता,
सिडको कामोठेसिडको गटाराची कामे सतत काढत असते, मात्र एक तरी गटार सुस्थितीत दाखवा असे आमचे प्राधिकरणाला आव्हान आहे. स्मार्ट सिटीचे स्वप्न तुम्ही आम्हाला दाखवता, मात्र आजची परिस्थिती पाहता ते स्वप्न गटारात वाहून जाईल अशी स्थिती आहे. यास सर्वस्वी सिडको जबाबदार आहे, असे मला वाटते.
- भाऊ पावडे,
शिवसेना उप शहरप्रमुख, कामोठे