पाण्याअभावी उड्डाणपुलावरील झाडे सुकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:19 PM2019-05-20T23:19:31+5:302019-05-20T23:19:37+5:30
लाखो रु पयांचे नुकसान: कुंड्यातील रोपेही झाली गायब; प्रशासनाचे दुर्लक्ष
पनवेल : नवीन पनवेल ते खांदा वसाहत शहराला जोडणारा उड्डाणपूल बांधण्यासाठी सिडकोने लाखो रुपये खर्च केले. त्यामुळे तासनतास रेल्वेच्या बंद फाटकाजवळ थांबणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळाला. वाहतूककोंडी देखील कमी झाली. मात्र या उड्डाणपुलावरील दुभाजकावर लावलेल्या झाडांकडे सिडकोचे दुर्लक्ष झाले आहे. या पुलावरील सर्व झाडे सुकली आहेत, तर कुंड्यामधील रोपेसुद्धा गायब झाल्याचे दिसून आले आहे.
नवीन पनवेल ते खांदा वसाहतीला जोडणाºया उड्डाणपुलावर सिडकोने काही वर्षांपूर्वी झाडे लावली होती. त्यासाठी एका ठेकेदाराला ठेका दिला होता, मात्र त्या ठेकेदाराने झाडांकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे झाडे उन्हात करपून मेली आहेत. काही झाडांना पाणी न घातल्यामुळे येथील झाडे सुकून गेली आहेत. त्यामुळे सिडकोचा भोंगळ कारभार समोर आला आहे. त्यानंतर सिडकोने पुन्हा या उड्डाणपुलावर कुंड्यात रोपे लावली आहेत. त्यासाठी लाखो रु पये या झाडांवर खर्च केले आहेत. मात्र यापूर्वीची लावलेली झाडे जगवता आली नाहीत तर या कुंड्यातील झाडे कशी जगतील, असा सवाल रहिवाशांकडून होत आहे.
उड्डाणपुलावर झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत, परंतु मागील काही दिवसांपासून हे फलक सुध्दा गायब झाले आहेत. त्याचप्रमाणे उड्डाणपुलाच्या दुभाजकावर लावलेल्या कुंड्यांमधील रोपट्यांसह मोठी झाडेही उन्मळून पडली आहेत तर कही करपून गेली आहेत. वेळोवेळी काळजी न घेतली गेल्याने ही झाडे सुकून गेली आहेत. असे असतानाही पुन्हा लाखो रुपये खर्च करून नवीन झाडे लावली जात असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.