विमानतळग्रस्त ओवळे गावावर अपघाताचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:37 AM2018-05-18T02:37:16+5:302018-05-18T02:37:16+5:30
विमानतळबाधित वरचे ओवळे गावात भू-सुरुंगांचा दगड घरावर कोसळल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
- वैभव गायकर
पनवेल : विमानतळबाधित वरचे ओवळे गावात भू-सुरुंगांचा दगड घरावर कोसळल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दगडामुळे घराला भगदाड पडल्यानंतरही शासकीय यंत्रणांनी तो दगड भू-सुरुंगांचा नसल्याचा दावा करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करून भू-सुरुंग लावताना नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप केला आहे.
नवी मुंबईत विमानतळासाठी दहा गावे विस्थापित होत आहेत. यामध्ये वरचे ओवळेचा समावेश आहे. गावाच्या मागील बाजूस उलवे टेकडी सपाटीकरणाचे काम सुरू आहे, यासाठी दररोज ब्लास्टिंग केली जाते. हे ब्लास्टिंग ग्रामस्थाच्या जीवावर बेतत आहे. बुधवारी दुपारी येथील विलास घरत यांच्या घरावर दगड कोसळले. छताला व भिंतीला भगदाड पडून दगड घरात पडले. सुदैवाने घरातील कोणी जखमी झाले नाही. भू-सुरुंगांमुळे परिसरात घरांना मोठ्या प्रमाणात हादरा बसत असतो. अनेक वेळा भांडी कोसळतात, असे प्रकार तर घडतच असतात. मात्र, ब्लास्टिंगमुळे उडालेले दगड थेट घरात भिंत आरपार करून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आम्हाला या ठिकाणी जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. सिडकोने अद्याप आमच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या नाहीत, जर का आम्ही या ठिकाणाहून आमचे घर सोडून दुसरीकडे राहायला गेलो, तर सिडको प्रशासन आमच्या मागणी मान्य करण्यास टाळाटाळ करेल, म्हणूनच आम्ही या ठिकाणीही जीव मुठीत धरून राहत असल्याचे येथील ग्रामस्थ बाळाराम म्हसकर सांगतात. ही ब्लास्टिंग सिडको तसेच केंद्राच्या देखरेखीखाली कार्यरत असलेली सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ मायनिंग फ्युअर रिसर्च या संस्थेच्या देखरेखीखाली होत असते. चार ठिकाणी ही ब्लास्टिंग वेगवेगळ्या टप्प्यात केली जाते. मात्र, वरचे ओवळे या ठिकाणच्या घरात उडालेला दगड हा नेमक ा ब्लास्टिंगचा आहे का? याबाबत पोलिसांसह केंद्राच्या मायनिंग फ्युअर रिसर्च संस्थेने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे? हा दगड ब्लास्टिंगचाच असल्याविषयी पुरावे नसल्याचे शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितले असून तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले.
छताला आणि भिंतीला भगदाड पाडून दगड कोठून आला? हा प्रश्न उपस्थित होत असेल तर ग्रामस्थांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे. कोणाच्या जीवावर बेतणारी घटना घडत असेल आणि शासकीय यंत्रणाला दगड कोठून आला? याबाबत माहिती मिळत नसेल, तर ही आश्चर्याची बाब आहे. ग्रामस्थांमध्ये या घटनेबाबत प्रचंड भीती पसरली आहे. दररोज भीतीच्या छायेत जगावे लागत आहे, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
>काय आहे ब्लास्टिंगची प्रक्रि या? : ब्लास्टिंग करीत असताना सिडको व सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ मायनिंग फ्युअर रिसर्च या दोन्ही संस्थेचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असतात. जागा, वेळ निश्चित करून त्याची माहिती दोन्ही संस्थांना दिली जाते. यानंतर या दोन्ही संस्थेचे प्रतिनिधी त्याची पाहणी करीत असतात, त्यानंतर ब्लास्टिंग केले जाते.
>बुधवारी घडलेल्या घटनेबाबत दगड नेमका कोठून आला, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. याबाबत तपास सुरू आहे. कंत्राटदारांनी नियमांचे पालन करून ब्लास्टिंग करावे, याबाबत आम्ही सूचना दिलेल्या आहेत.
- विनोद चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे
>स्वत:च्या घरात जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. ब्लास्टिंगमुळे अनेक वेळा घरातील भांडी कोसळत असतात. भूकंपासारखी परिस्थिती निर्माण होते. आम्हाला घरे रिकामी करायचीच आहेत. मात्र, आम्ही घरे सोडल्यास सिडको मागण्यांकडे दुर्लक्ष करेल. सिडकोने आश्वासने पाळावीत, आम्ही घरे रिकामी करू.
- बाळाराम म्हसकर, ग्रामस्थ, वरचे ओवळे