अक्षय्य तृतीयेनिमित्त सोनेखरेदीला उधाण, सराफा दुकानांमध्ये गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 02:46 AM2019-05-08T02:46:26+5:302019-05-08T02:46:48+5:30
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी शुभ मानली जाते. हा मुहूर्त साधत नवी मुंबईकरांनी मंगळवारी सोनेखरेदीसाठी सराफांच्या दुकानात एकच गर्दी केली होती.
नवी मुंबई - साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी शुभ मानली जाते. हा मुहूर्त साधत नवी मुंबईकरांनी मंगळवारी सोनेखरेदीसाठी सराफांच्या दुकानात एकच गर्दी केली होती. सोनेखरेदीला उधाण आले असतानाच विविध योजना जाहीर करूनही ग्राहकांनी गृहखरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. त्या तुलनेत अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर वाहनखरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला.
अक्षय्य तृतीयेसाठी शहरातील सराफांची दुकाने दोन दिवसांपासून सजली होती. सोनेखरेदीवर सराफांनी वेगवेगळ्या आकर्षक योजना जाहीर केल्या होत्या. काहींनी दागिन्यांच्या बनावट शुल्कात सूट जाहीर केली होती. एकूणच सकाळपासून सराफांच्या दुकानात सोनेखरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली. विशेषत: वाशी विभागात सराफांची मोठमोठी व ब्रॅण्डेड दुकाने आहेत, या दुकानात दागिन्यांचे नवनवीन आकर्षक डिझाईन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली होती. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे दोन वर्षांत सराफांच्या व्यवसायाला काही प्रमाणात उतरती कळा लागली होती. मात्र, गुढीपाडव्या पाठोपाठ अक्षय्य तृतीयेलाही ग्राहकांकडून सोनेखरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती नवी मुंबईतील सुप्रसिद्ध ज्वेलर्स महेंद्र जैन यांनी ‘लोकमत’ला दिली.
सोनेखरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला तरी गृहखरेदीकडे मात्र ग्राहकांनी पाठ फिरविली. शहरातील लहान-मोठ्या विकासकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली होती. आकर्षक योजना जाहीर केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने विकासक हवालदिल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मालमत्ता विकल्या न गेल्याने, बिल्डर्स आणि गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. त्यामुळे रियल इस्टेट मार्केटवर चिंतेची काजळी पसरली आहे. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त काही प्रमाणात का होईना तारून नेईल, असा विश्वास विकासकांना वाटत होता. मात्र, हा विश्वासही फोल ठरल्याने लहान-मोठे विकासक आणि गुंतवणूकदारांत काळजी पसरली आहे.
वाहनखरेदीला चांगला प्रतिसाद
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अनेकांनी सोनेखरेदी केले. मात्र, काहींनी वाहनखरेदीला पसंती दिली. विशेषत: दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे शहरातील वाहन वितरकांकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे चारचाकी वाहनांचीही या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे सांगण्यात आले.