नवी मुंबई : महानगरपालिकेमधील सचिवांच्या कामकाजाविषयी शिवसेना नगरसेवकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सचिव सभागृहात असताना मोबाइलवर बोलत असतात अनेक वेळा महत्त्वाच्या प्रसंगी सभागृहाबाहेर जात असल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी पक्षाला अनुकूल होईल अशाप्रकारे कामकाज होत असल्याबद्द तीव्र आक्षेप घेण्यात आले असून, याविषयी राज्य शासनाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेचे सचिव चंद्रकांत देवकर निवृत्त झाल्यापासून या विभागातील कारभार वारंवार वादग्रस्त होऊ लागला आहे. एक वर्षापासून विद्यमान सचिवांविषयी शिवसेना नगरसेवकांनी वारंवार आक्षेप नोंदविले आहेत. मे महिन्यापासून सुमारे सहा महिन्यांतील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त एकाच सभेत मंजूर करण्यात आले. वास्तविक प्रत्येक सभेच्यावेळी मागील सभेचे इतिवृत्त मंजूर झाले पाहिजे. परंतु मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे व इतर कारणे सांगून इतिवृत्तास विलंब केला जात आहे. शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी याविषयी महापालिका आयुक्त व राज्य शासनाकडे तक्रार केली आहे. सर्वसाधारण सभेतील इतिवृत्तावर सह्या झाल्यानंतरच ते कामकाज अधिकृत होते. परंतु सहा महिने विलंबाने इतिवृत्त आल्याने त्याचा परिणाम विकासकामांवर होत असून, याविषयी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नामदेव भगत यांनी केली आहे. ऐरोलीतील ज्येष्ठ नगरसेवक एम.के. मढवी यांनीही सचिवांवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. आरोग्यासह इतर महत्त्वाचे विषय स्थायी समितीत येणार असले की मढवींना कार्यक्रमपत्रिका दिली जात नाही. जानेवारी महिन्यात तहकूब सभेतही विरोधकांनी पोलची मागणी केल्यानंतरही सचिवांनी त्याविषयी तत्काळ निर्णय घेतला नाही. पोल मागितल्यानंतर प्रत्येक नगरसेवकाने विषयाच्या बाजूने व विरोधात मत नोंदवायचे असते. परंतु ही प्रक्रिया पारदर्शीपणे केली नसल्याचे आरोप करण्यात आले. महत्त्वाच्या प्रसंगी सचिव सभागृहाबाहेर गेल्याबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
सचिवांच्या मनमानीमुळे शिवसेना आक्रमक
By admin | Published: February 08, 2016 2:49 AM