पंकज रोडेकर / ठाणेवरसावे पुलाच्या दुरुस्ती कामामुळे ठाणे शहरात अवजड (गुड्स) वाहनांची संख्या नियमित धावणाऱ्या याच वाहनांपेक्षा दुपटीने वाढली. यामुळे ठाणेकरांसाठी जटील असलेली वाहतूककोंडीची समस्या आणखी जटील झाली. ती सोडवताना, वाहतूक पोलिसांचे कंबरडे मोडले असताना आता भारतीय चलनातून रद्द केलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांमुळे शहरातून रोज धावणाऱ्या ५० ते ६० हजार अवजड वाहनांपैकी ५० टक्के वाहनांची गर्दी रस्त्यांवरून ओसरल्याने पोलिसांबरोबर नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या मंडळींवर सुट्या पैशांअभावी वाहने रस्त्यावरच उभी करण्याची वेळ ओढवल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे शहरात नवीन वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच मुंबईसह अन्य राज्यांत जाणारे महामार्ग शहरातूनच जात असल्याने माल आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या २०-२५ हजार वाहनांची संख्या शहरात असताना मध्यंतरी मुंबईतून वरसावेमार्गे जाणारी वाहतूक बंद झाल्याने शहरात त्या ४० ते ४५ हजार अवजड वाहनांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे ज्या दिवशीही वाहतूक ठाण्यातून वळवल्यावर त्या दिवसापासून प्रचंड वाहतूककोंडी सुरू झाली. याचदरम्यान, प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या. त्यामुळे तूर्तास काही प्रमाणात कोंडीतून नागरिकांची सुटका झाली होती. पण, पाचशे, हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्याने सुट्या पैशांअभावी ५० टक्के वाहतूक झटक्यात कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुट्या पैशांअभावी वाहनचालकांची उपासमार होऊ लागल्याने ती कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नोटबंदीमुळे घटली वाहतुकीची कोेंडी!
By admin | Published: November 18, 2016 3:21 AM