स्वच्छता अभियानामुळे पेंटरांना सुगीचे दिवस, भिंतींसह दुभाजकांनाही रंगरंगोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 04:28 AM2019-01-06T04:28:54+5:302019-01-06T04:29:22+5:30
भिंतींसह दुभाजकांनाही रंगरंगोटी : नवी मुंबईसह इतर शहरातील पेंटर शहरात
नवी मुंबई : स्वच्छता भारत मिशन २०१९ अभियानांर्तगत नवी मुंबईतील भिंतींवर स्वच्छतेचे संदेश, स्वच्छतेविषयी विविध रंगबिरंगी चित्रे काढण्यात येत आहेत, तसेच रस्त्यावरील दुभाजकांनाही रंगरंगोटी केली जात आहे. या अभियानाच्या निमित्ताने पेंटरांना उत्पनाचे साधन प्राप्त झाले असून, सुगीचे दिवस आले आहेत. रोजगारासाठी नवी मुंबईसह इतर शहरातील पेंटर नवी मुंबईत कामानिमित्त येत आहेत.
स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१७ मध्ये नवी मुंबई महापालिकेने देशात आठवा आणि राज्यात पाहिला क्र मांक पटकाविला होता. २०१८ सालीदेखील नवी मुंबई शहराने घनकचरा व्यवस्थापनात देशात बाजी मारली होती. या अभियानाच्या २०१९ च्या पर्वाला सुरुवात झाली असून, त्याअनुषंगाने विविध कामे करण्यास सुरु वात झाली आहे. स्वच्छतेत बाजी मारण्यासाठी नवी मुंबई महापालिकेतर्फे विविध युक्त्या, संकल्पना राबविल्या जात आहेत. त्यालाच अनुसरून शहरातील विविध भिंती, उड्डाणपुलांवर स्वच्छतेचा, कचरा वर्गीकरण, स्वच्छतेचे फायदे याबाबत संदेश देणारी रंगबिरंगी चित्रे रेखाटण्यात आली असून, स्वच्छतेची घोषवाक्यदेखील देण्यात आली आहेत. शहरातील रस्त्यांवर स्वच्छता राखण्याबरोबर रस्त्यावरील दुभाजकांना काळ्या-पिवळ्या रंगाने रंगविण्यात येत आहे. स्वच्छता अभियानात शहर देशात पहिला क्रमांक पटकाविण्यासाठी करण्यात येणाऱ्या स्वच्छतेसाठी शहरात कोट्यवधी रु पयांचा खर्च केला जात आहे. नवी मुंबई शहराने क्रमांक पटकाविणे जरी प्रत्येक नवी मुंबईकरांसाठी अभिमानाची बाब असली, तरी या कामामुळे नवी मुंबईतील पेंटरांना मोठा रोजगार उपलब्ध झाला असून त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. काही वर्षांपासून फ्लेक्स बॅनरची प्रथा आल्यावर रंगकाम आणि चित्रे रेखाटण्याची कला असलेल्या पेंटरांच्या उदर्निवाहाचा प्रश्न निर्मण झाला होता; परंतु या अभियानामुळे पेंटरांना रोजगार प्राप्त झाला असून, अनेक नाका कामगारांच्या रोजगाराचा प्रश्नदेखील मार्गी लागला आहे. स्वच्छ अभियानाच्या निमित्ताने नवी मुंबई शहरात रोजगार प्राप्त होत असल्याने या कामासाठी नवी मुंबईसह मुंबई, ठाणे, पनवेल आदी भागातून पेंटर कामानिमित्त शहरात येत आहेत. दुभाजकांना रंग देणाºया पेंटरांना ६०० ते ७५० रु पये तर स्वच्छतेचे विविध संदेश देणारी चित्रे रेखाटणाºया पेंटरांना १००० ते १२०० रुपये रोजगार प्राप्त होत आहे.