अंतर्गत रस्ते बंद असल्याने वाहनांची महामार्गांवर वाढली वर्दळ; नागरिकांना नाहक त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:10 AM2020-07-25T00:10:18+5:302020-07-25T00:10:31+5:30
हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणचे रस्ते करण्याची मागणी
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील ४२ ठिकाणे वगळता, इतर ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे, परंतु बंद केलेले रस्ते अद्याप खुले करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सायन-पनवेल मागमार्ग आणि पामबीच मार्गावरून वाहनांची वर्दळ वाढली असून, नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणचे रस्ते खुले करण्याची मागणी केली जात आहे. नवी मुंबई शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढत आहे. नागरी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, तसेच संक्रमण वाढू नये, यासाठी शहरात ३ जुलैपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला होता. त्यानंतर, या लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ करीत १९ जुलैपर्यंत वाढविण्यात आला.
मात्र, महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून शहरात सरसकट राबविलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असून, शहरात रुग्ण संख्या जास्त प्रमाणावर वाढत असलेली ४२ ठिकाणे निश्चित करून या ठिकाणांना हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. आता हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन सुरूच ठेवण्यात आला आहे. संपूर्ण शहरात लॉकडाऊन घोषित केला होता, त्यावेळी शहरातील अनेक ठिकाणचे अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले होते.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतरही यामधील अनेक रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर जाणाऱ्या नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.रस्ते बंद असल्याने सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर आणि पामबीच मार्गावरून विविध ठिकाणी ये-जा करणाºया वाहनांची वर्दळ वाढली आहे. हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणचे अंतर्गत रस्ते सुरू करावेत, अशी मागणी यामुळे होत आहेत.