नवी मुंबई : वाहनांच्या ब्रेक टेस्टसाठी आरटीओला रहदारीच्या रस्त्यावरच चाचणी घ्यावी लागत आहे. अडीचशे मीटर वाहन चालवूनच ब्रेकची चाचणी व्हावी अशा न्यायालयाच्या सूचना आहेत. मात्र ही प्रक्रिया पार पाडताना जागोजागी आरटीओला अडचणींचा सामना करावा लागत असल्याने न्यायालयाची अट बाधक ठरताना दिसत आहे.घणसोली येथील पामबीच मार्गावर आरटीओकडून जड-अवजड वाहनांच्या ब्रेकची चाचणी घेतली जात आहे. त्यामुळे काही दिवसांपासून त्याठिकाणी रस्त्यालगत वाहने उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु सकाळपासून रांगेत उभ्या राहणाºया या वाहनांमुळे त्याठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाºयांची गैरसोय होत आहे. यामुळे आरटीओची द्विधा मन:स्थिती झाली आहे. एकीकडे नागरिकांच्या नाराजीला सामोरे जात दुसरीकडे न्यायालयाच्या अटींचे पालन करावे लागत आहे. मोठ्या वाहनांची ब्रेक टेस्ट घेण्यासाठी अडीचशे मीटर वाहन चालवले जावे अशी न्यायालयाची अट आहे. त्यामुळे मागील काही वर्षे एपीएमसी येथील रस्त्यावर सुरू असलेली ही प्रक्रिया घणसोलीतील पामबीच मार्गाचा वापर करावा लागत आहे. मात्र न्यायालयाची ही अट आरटीओला चांगलीच अडचणीची ठरत आहे.नवी मुंबईत आरटीओकडे कार्यालयासाठी देखील हक्काची पुरेशी जागा नाही. एपीएमसी मार्केटमधील भाड्याच्या जागेत सद्य:स्थितीला कार्यालय चालवले जात आहे. यामुळे किमान चाचणीसाठी तरी मोकळी जागा मिळावी यासाठी प्राधिकरणाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यानुसार ३१ जानेवारीपर्यंत नेरुळमधील नियोजित जागा ताब्यात देण्याचे आश्वासन पीडब्ल्यूडीने आरटीओला दिले आहे. परंतु या नियोजित जागेला देखील राजकीय विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहनांची ब्रेक टेस्ट नेमकी करायची तर कुठे, असा प्रश्न अधिकाºयांंना सतावत आहे. त्यावर राज्य शासनाच्या मध्यस्थीने तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्यक्षात रस्त्यावर वाहन पळवून ब्रेकची चाचणी घेण्याऐवजी एकाच जागी मशिनवर देखील स्टेशनरी टेस्ट घेणे शक्य आहे. यासंबंधी राज्य सरकारने उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली असल्याचेही समजते, अन्यथा अडीचशे मीटरची अट कायम राहिल्यास मुंबईसह नवी मुंबई आरटीओपुढे जागेचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. नवी मुंबईत अद्याप काही ठिकाणी मोकळी जागा शिल्लक असल्याने त्याठिकाणी आरटीओची चाचणी होवू शकते. मात्र मुंबईत रस्त्यावर चाचणी घ्यायची असल्यास एखादा रस्ता रहदारीसाठी बंद करण्याशिवाय पर्याय नाही.
वाहनांच्या ब्रेक टेस्टसाठीची अट बाधक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 2:32 AM