मीरा रोड : वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असतानाच मोठ्या प्रमाणावर धूर सोडणारे फटाके फोडले गेल्याने शहराच्या प्रदूषणात आणखीनच भर पडली आहे. याचा परिणाम जास्तकरून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना भोगावा लागत आहे. या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाच्या विकारांना तोंड द्यावे लागत असून यंदा रुग्णांमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
शहरात दररोज किमान लाखो लीटर पेट्रोल व डिझेलचा धूर निघत असून या धुरामुळे होणारे प्रदूषणही होत आहे. आता दिवाळीत धूर सोडणारे फटाके फोडले गेल्याने शहराच्या प्रदूषणात आणखीनच भर पडली असून याचा परिणाम लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना भोगावा लागत आहे. कुंद वाऱ्यामुळे फटाक्यांतून निर्माण झालेला धूर वातावरणात तसाच राहत असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. याविषयी अधिक माहिती देताना नाक-कान-घसातज्ज्ञ डॉ. नीपा वेलीमुट्टम म्हणाल्या, मागील काही वर्षांत फटाके वाजवण्याचे प्रमाण घटले आहे. यामुळे ध्वनिप्रदूषण कमी झाले असले, तरी वायुप्रदूषणात मात्र घट झालेली दिसत नाही. आवाजाचे फटाके कमी झाले असले, तरी रोषणाई, प्रकाशाच्या फटाक्यांचे प्रमाण वाढले आहे. विविधरंगी प्रकाश पसरवणारे हे फटाके मात्र मोठ्या प्रमाणात धूर सोडतात. हा धूर दीर्घकाळ हवेमध्ये राहत असल्याने त्याचा परिणाम नक्कीच आरोग्यावर होतो. यावर्षी लहान मुलांच्या श्वसनविकारात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
फटाक्यांमधून निघणारे सल्फर डायआॅक्साइड, नायट्रोजन डायआॅक्साइड हे अनैसर्गिक विषारी वायू हवेत मिसळतात व ही हवा नाकाद्वारे शरीरात घेतल्यास कपाळ, गालाखालचा भाग, डोळे, डोके दुखू लागणे, डोके जड होणे, खाली वाकल्यास डोके दुखणे, श्वसननलिकेला सूज येणे, नाक चोंदणे, लाल चट्टे येणे, कफ जमा होणे, ही लक्षणे दिसून येतात. नाक गळणे, नाक चोंदणे ही फटाक्यांच्या प्रदूषणातून निर्माण होणारी लक्षणे आहेत.वाहनांच्या संख्येतही झाली वाढगेल्या दोन वर्षांत मीरा-भार्इंदरमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे वातावरणात प्रदूषण वाढत आहे. वाढत्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून वाढत्या धुरामुळे श्वसनविकारांमध्ये वाढ झाली असून आता फटाक्यांच्या धुराची भर पडली आहे. वाढत्या वायुप्रदूषणाबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.