नवी मुंबई : वाशी सेक्टर १६ ए मधील नाल्यावर महापालिकेने वाहने पार्किंगसाठी प्रशस्त जागा बनविली आहे. या ठिकाणी वाहने पार्किंगचे शुल्क आकारले जात असल्याने पैसे वाचविण्यासाठी नागरिक समोरच असलेल्या सेक्टर १७ मधील इमारतींच्या बाहेर बेकायदेशीरपणे वाहने उभी करीत आहेत, त्यामुळे या ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.नवी मुंबईत महापालिकेच्या वतीने शहरातील पार्किंगची गैरसोय थांबविण्यासाठी नागरिक आणि वाहनांची जास्त वर्दळ असणाऱ्या भागात वाहने पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाशीमधील सेक्टर १७ परिसरात विविध कार्यालये, दुकाने, शोरूम, शाळा, कॉलेज, रेल्वेस्थानक, वाशी बस डेपो, सायन-पनवेल महामार्ग, विविध मॉल, हॉटेलदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यामुळे कामानिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. नागरिकांची वर्दळ लक्षात घेता रेल्वेस्थानक, विविध रस्त्याच्या कडेला पालिकेच्या वतीने पे अॅण्ड पार्क सुरू करण्यात आले होते. या जागा अपुºया पडत असल्याने वाशी सेक्टर १६ ए मधील मोठा पावसाळी नाला बंदिस्त करून सुमारे १५० हून अधिक चारचाकी वाहने पार्किंगची क्षमता असलेले वाहनतळ उभारण्यात आले आहे. यामध्ये दुचाकी वाहनांसाठी देखील भव्य जागा राखून ठेवण्यात आली असून, पार्किंग करण्यात येणाºया चारचाकी वाहनांसाठी प्रतितास १० रु पये आणि दुचाकी वाहनांसाठी पाच तासांचे १० रु पये शुल्क आकारण्यात येत आहे; परंतु पार्किंगचे पैसे वाचविण्यासाठी नागरिक सेक्टर १७ मधील इमारतींच्या बाहेरील रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग करीत आहेत. वाहने पार्किंग करण्यासाठी या ठिकाणी जागा मिळत नसल्याने अनेक वेळा एकामागे एक वाहने पार्किंग केली जात असून, दुचाकी वाहने पदपथावर पार्किंग केली जात आहेत. कार्यालयांच्या आणि सोसायट्यांच्या गेटवर देखील वाहने उभी केली जात असल्याने सोसायटीच्या आवारात वाहने ने-आण करताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी वाहने आणि नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत असून, नागरिकांना पदपथावरून चालणेदेखील जिकिरीचे झाले आहे. रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर अतिरिक्त पार्किंग होणाºया ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते; परंतु पार्किंगचे पैसे वाचविण्यासाठी वाहनचालकांमुळे इतर नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
वाशीतील वाहनतळ पडले ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:34 PM