नवी मुंबई : राहण्यास योग्य शहरात नवी मुंबईचा देशात दुसरा क्रमांक आला आहे. असे असले तरी सायन-पनवेल महामार्गाच्या दुरवस्थेमुळे महापालिकेची नाचक्की होत आहे. खड्डेमय महामार्गामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकास बाधा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील ९ किमी लांबीचा रस्ता हस्तांतरित करावा,यासाठी महापौर जयवंत सुतार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आता साकडे घातले आहे.मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या नवी मुंबई शहराला जागतिक दर्जा प्राप्त होवू लागला आहे. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेचा सन्मान झाला आहे. तसेच राहण्यासाठी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबईचा गौरव झाला आहे. चोवीस तास पाणी, मलनि:सारणाची तंत्रशुध्द प्रणाली, मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे नियोजनबध्द जाळे, उद्याने, शैक्षणिक सुविधा, नोकरीच्या उत्तम संधी आदीमुळे शहराला वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. मुंबईत जाण्यासाठी सायन-पनवेल महामार्गाचा अवलंब केला जातो. परंतु महामार्गावरील खड्ड्यांमुळे बाहेरून येणारे नागरिक महापालिकेच्या कार्यक्षमतेवर शंका व्यक्त करीत आहेत. ही बाब महापौर जयवंत सुतार यांनी रविवारी वाशी येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आखात्यारित आहे. त्यामुळे महापालिकेला त्याची डागडुजी करता येत नाही. वाशी ते बेलापूरपर्यंतचा ९ किमी लांबीचा महमाार्गाचा भाग हस्तांतरित केल्यास त्याची नियोेजबध्द निगा राखणे शक्य होईल, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यामुळे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, शहरातील नागरी प्रश्नांसाठी लढणाºया नवी मुंबई फर्स्ट चॅरिटेबल ट्रस्ट या संघटनेने वाशी ते बेलापूरपर्यंतचा ९ किमी लांबीचा महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित व्हावा, यासाठी मोहीम छेडली आहे. याचाच एक भाग म्हणून या संस्थेच्या एका शिष्टमंडळाने अलीकडेच महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेवून यासंदर्भात चर्चा केली होती. इतकेच नव्हे, तर येत्या काळात ही चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.
महामार्गाच्या दुरवस्थेमुळे महापालिकेची नाचक्की; मुख्यमंत्र्यांकडे केली सायन-पनवेल रस्त्याच्या हस्तांतरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 1:59 AM